चरैवेती…. चरैवेती…..

नुकतीच मायबोलीवर एक पोस्ट पाहिली. इलाही मेरा जी आए….

पोस्ट पाहुन मनाच्या तळात खोल दाबलेली इच्छा परत एकदा वर आली.. निरुद्देश भटकण्याची.  काहीतरी पाहण्यासाठी भटकण्यापेक्षा, भटकताना अचानक काहीतरी सामोरे आलेले पाहायची.  ही इच्छा कधीपासुन मनात आहे.  पण ती कधी साकार होणार आहे याची आजमितीला काहीच खात्री देता येत नाही.    जबाबदा-यांचे ओझे आहे असे म्हणता येणार नाही कारण जबाबदा-या स्वतःहुन आनंदाने घेतल्या आहेत.  त्यांचे ओझे अजिबात नाही.  पण त्याचवेळी या जबाबदा-या नसत्या तर कदाचित मनात येईल तेव्हा बाहेर पडता आले असते असेही वाटत राहते.

असेही वाटते आणि तसेही वाटते.  या जरतरच्या जंजाळात मन अडकुन राहते.  उद्या खरोखरीच मन मानेल तसे उंडारण्यासारखी परिस्थिती आली तर मी अशी उंडारेन का?  की ‘एकटी कशी जाणार’,  ‘वाटेत कोण कसे भेटेल,  वाईट अनुभव आले तर काय’ या प्रश्नजंजाळात भिरभिरत राहणार?

जे असेल ते,  सध्या तरी असे उंडारणे हे एक स्वप्न आहे.  तशी अजुन बरीच स्वप्ने आहेत.

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले….

या हजारो ख्वाईशांपैकी थोड्याफार तरी पु-या होऊदे.  आणि त्या पु-या होईतो  माझ्या हातापायात बळ टिकुदे.  आज त्या जगन्नियंत्याचरणी हीच प्रार्थना..!!!!!!   आमेन.

चरन्बै मधु विंदती, चरन्त्स्वधु मुदंबरम
सुर्यस्य पस्य श्रीमानम, यो न तंद्रयते चरन,
चरैवेती  चरैवेती…..

वरील श्लोकातले चरैवेती चरैवेती हे शब्द मी बराच काळ ऐकतेय.  कधीकधी खाताना मागे रेंगाळलेल्या कोणा मित्राला पाहुन गंमतीने मुद्दाम चरैवेती.. म्हणुन चिडवलेही आहे.  🙂  पण हा श्लोक मला देवनागरीमध्ये लिहिलेला कुठे मि़ळाला नाही.  नेटवर इंग्रजीतुन लिहिलेला मिळाला त्यावरुन मी देवनागरीत लिहिलाय.   लिहिताना नक्कीच चुका केल्या असणार.  जर कोणाला काही चुक सापडली तर सांगा, मी दुरुस्त करेन.

याचा साधारण अर्थ असा की –

फिरणा-या मधमाशीला मधाचा लाभ होतो, उडणा-या पक्ष्याला मधुर फळे खायला मिळतात. सतत मार्गक्रमण करत राहणा-या सुर्याला मानाचा नमस्कार केला जातो.

म्हणुन माणसानेही सतत चालत राहिले पाहिजे.  पुढे चला, पुढे चला…….

 

Advertisements