टाईमपास………..

ऑफिसातुन दोन आठवडे सुट्टी घेतली आणि घरी बसुन टाईमपास केला. भरपुर काही करायचे मनात असते पण प्रत्यक्ष मात्र काहीच होत नाही. आळस भरुन राहिलाय. चार दिवस आंबोलीला गेले. तिथेही नुसते बसुन दिवस काढले. नाही म्हणायला तिथे शेत विकत घेण्याच्या दृष्टीकोनातुन काहीतरी हालचाल झाली इतकेच. बाकी ‘राग दरबारी’ वाचत बसले. हे पुस्तक फारच विचित्र आहे. मध्येच वाटते की यातला शब्दन शब्द अगदी आजही खरा आहे. ७० च्या दशकात लिहिले गेलेले हे पुस्तक आजही आजच्या काळाशी तितकेच इमान राखुन आहे. तर कधी वाटते, की यात खुपच निगेटिवीटी भरलीय. कुठे काहीही पॉझिटिव लिहिलेलेच नाही. आणि तरीही ते आजही तितकेच खरे वाटतेय. 😦

गेल्या वर्षी केलेला मसाला संपुन ६ महिने झाले तरी अजुन नविन मसाला करायला मुहुर्त काही सापडत नव्हता. तो एकदाचा शुक्रवारी सापडला. संध्याकाळि उठले आणि एपिएमसीत गेले. गेलेले फक्त मिरच्या आणण्यासाठी पण सोबत इतरही भरपुर सामान घेऊन आले. ऐशुला द अवेंजर्स बघायचा होता. त्याची तिकिटेही घेऊन आले. शनिवारी पुर्ण सकाळ चित्रपटाच्या भानगडीत गेली. कलत्या दुपारी मिरच्या वाळवत बसले. तिन किलो मिरच्यांचे देठ काढेपर्यंट सात वाजले. नंतर स्थानिक जिममध्ये जाऊन फॅटलॉससाठीच्या प्लॅन्ससाठीची चौकशी… तळवलकर्स खुपच महागडे आहे. शेजारच्या दुस-या जीमने त्याच सोयी जवळजवळ २/३ पैशात दिल्या. लेकीचा हट्ट जीमच पाहिजे म्ह्णुन.. नाहीतर रोज सकाळी उठुन धावायला गेली असती तरी वजन कमी झाले असते. पण जाऊदे, ह्या निमित्ताने रोज सकाळि लवकर तरी उठेल.

आजचा अख्खा दिवस परत कामातच गेला. गावाहुन हिरव्या मिरच्या आणलेल्या. त्यांच्यात मसाला भरुन, सुकवुन केलेल्या सांडग्या मिरच्या माझ्या खास आवडीच्या. संध्याकाळ्भर लागुन हा उद्योग केला. आता दोन्-चार दिवस उन्हात वाळवाव्या लागतील. मिरच्यांना पण उन दाखवले.

उद्या परत ऑफिस आहे, परवा सुट्टी. उद्या जर सुट्टी घेता आली तर संध्याकाळपर्यंत मसाला कुटूनही होईल. उद्या करते फोन नी पाहते. 🙂

Just wondering how to pep up life… I guess i will start my studies again… that will surely pep me up..

Advertisements

बाय बाय २०११ वेलकम २०१२………

आज २३ डिसेंबर.. अजुन एक वर्ष संपतंय.. या वर्षी मी काय कमावले? काय गमावले? हातात काय शिल्लक राहिले?

नेहमीप्रमाणे या वर्षीही मी नविन धडे शिकले. बहुतेक माझे आयुष्य असेच नविन नविन धडे शिकण्यात जाणार आहे. आधी शिकलेल्या धड्यांमधुन वेचलेले शहाणपण (???) वापरण्याची संधी येत नाही, पण नविन धडे मात्र मिळतच राहताहेत.

तरीही वेळ अजुन गेलेली नाहीय. गेलेला वेळ माझा नव्हताच. आता पुढे असलेला वेळ मात्र सगळा बोनस आहे असे समजुन कंबर कसुन कामाला लागावे हे उत्तम.

या वर्षी शिकलेल्या धड्यांना पुढच्या वर्षी वापरायची संधी मिळो. २३ डिसेंबर २०१२ ला मी जेव्हा हे परत वाचेन तेव्हा आजची मी नसेन.

आजची मी नक्की कशी आहे? वजन वाढत वाढत ७४ किलोवर जाऊन पोचलेय. रोज ‘आहारातुन तेल हद्दपार करायचेय’ ही घोषणा करतेय, पण अजुन तेल काही हद्दपार झालेले नाहीय. रोज तेच तेच डाळ, भात, भाजी, चपाती खाऊन कंटाळलेय, आठवड्याचा मेन्यु बनवायचा हे गेले कित्येक आठवडे ठरवतेय. केसात मेंदी घालायला वेळ मिळत नाहीय, ब्लॉग्स वाचवाचुन रेसिपी गोळा करुन ठेवल्यात पण त्यांना प्रत्यक्षात उतरवायला वेळ नाही. आणि वेळ नसायला मी करतेय तरी काय एवढे मोठ्ठे काम? तर वेळ वाया घालवणे हेच एक मोठ्ठे काम करतेय…

पुढच्या वर्षी मी जेव्हा हे वाचेन तेव्हा आजची मी तेव्हा नसेन ह्या आशावादावर ह्या वर्षाचा निरोप घेते. बाय बाय २०११ वेलकम २०१२………

खानदेशी मांडे

मांडे हा शब्द मी साधारण दुसरी-तिसरीत असताना मराठीच्या पुस्तकात पहिल्यांदा वाचला. मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले.. वगैरे वाचुन मांडे म्हणजे काहीतरी खायचा पदार्थ आहे हे लक्षात आले. पण हा पदार्थ दिसतो कसा, खातात कशाबरोबर इत्यादी प्रश्न मनात उपस्थित झाले. म्हणजे तसे मला तेव्हा जिलेबी, पुरणपोळी इत्यादी पदार्थही कसे दिसतात ते माहित नव्हते. पण ते शब्द कानावरुनही गेले नव्हते, त्यामुळे अर्थात दिसतात कसे हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता.

मग काही दिवस मी आईच्या मागे भुंगा लावुन दिला, ‘मांडे म्हणजे काय ते मला सांग.’ आता आंबोलीसारख्या खेड्यात राहणा-या माझ्या आईनेही मांडे कधी ऐकले नव्हते. ती मला काय सांगणार कप्पाळ??!! तिला फक्त तांदळापासुन बनवण्यात येणारे पोळ्या, खापरोळ्या, शिरवाळ्या इत्यादी पदार्थ माहित होते. शेवटी तिने मांडे हे आंबोळीसारखेच असतात असे मला सांगुन स्वतःची सुटका करुन घेतली. सगळे जग तांदुळमयच आहे यावर माझा तेव्हा खुपच विश्वास होता, त्यामुळे मीही मांडे हा आंबोळीसारखा दिसणारा, तांदळापासुन बनवलेला काहीतरी गोड गोड पदार्थ आहे असा माझा समज करुन घेतला. कालांतराने मी हे सगळे विसरुनही गेले.

काही वर्षांपुर्वी लोकप्रभाचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील पदार्थांवर एक विशेषांक निघाला होता. त्यात मांड्यांचा उल्लेख वाचला. परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. पण एक पदार्थ म्हणुन मांड्यांबद्दल काहीच माहिती त्या अंकात दिली नव्हती. लेखकाने ‘मांडे खुप मोठे होते, एकाचे चार तुकडे करुन आम्ही खाल्ले’ म्हणुन लिहिले होते. परत माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू….. इतका मोठा पदार्थ की चारजणांना खावा लागला? नक्कीच लेखकाची खाण्याची क्षमता कमी असणार…….

तेव्हा इंटरनेट वगैरे फारसे नसल्याने गुगलुन वगैरे पाहताही आले नाही.. (आता सगळे कसे सोप्पे झालेय ना?? डोक्यात प्रश्न आला की चला लगेच गुगलवर…… )

मांड्यांना मी परत एकदा विसरले. तीनचार वर्षांपुर्वी ऑफिसात सटाणा-नाशिकच्या एका मित्राने पुरणपोळीसदृष्य एक पदार्थ आणला. एकदम पातळ कवर आणि त्यात अतिशय कोरडे असे गोड सारण. आकार कसा असणार याचा पत्ता लागेना कारण त्याने तुकडे करुन आणलेले. हे काय आहे असे विचारल्यावर तो म्हणाला, आमच्याकडे ह्याला मांडे म्हणतात. तुम्ही पुरणपोळी म्हणा आणि खा. मी एकदम उडीच मारली. म्हटले, गेले कित्येक वर्षे मी जे मांडे मांडे म्हणुन ऐकतेय ते आज असे अचानक पुढ्यात आले….

मग त्या मित्राला विचारले कसे करतात वगैरे वगैरे. तो म्हणाला, खुप कठीण आहेत करायला. माझी आई हातांवर अश्शी अश्शी फिरवुन करते आणि मग खापरावर भाजते. मी परत बुचकळ्यात. आमच्याकडे मातीचे मडके फुटले की त्याच्या तुकड्याला खापर म्हणतात. आता ह्या लोकांनी खापराच्या तुकड्यांवर कसे काय भाजले असणार हे मांडे?? छ्या.. खुप गर्दी झाली डोक्यात विचारांची. त्या मित्राला माझी दया आली. तो म्हणाला, कधीतरी माझ्या गावी ये आणि बघ कसे करतात ते मांडे.

तर मित्रांनो, माझ्या त्या दिव्य मित्राच्या घरी जाऊन मांडे बघण्याचे भाग्य मला ह्या दस-याला लाभले. त्याच्या घरी चक्रपुजा होती. त्या निमित्ताने त्याने बोलावले. म्हणाला, मांडे हा चक्रपुजेतला एक महत्वाचा घटक आहे, तर तुला त्या निमित्ताने पहायला मिळेल मांडे कसे करतात ते. मी मग अगदी सुरवातीपासुन पाहिले मांडे कसे करतात ते आणि तुमच्यापैकी कोणी माझ्यासारखेच अज्ञ असतील मांड्यांच्या बाबतीत तर त्यांचेही अज्ञान दुर व्हावे म्हणुन इथे लिहिण्याचा उद्योग करतेय…

बाकी हे मला पाककृतीतही टाकता आले असते, पण जी पाकृ मला ह्या जन्मात करायला जमणार नाहीय ती उगाच इथे टाकायला जीव धजावला नाही. इथे टाकण्यासाठीची पाकृ आधी आपल्याला तरी करता यायला पाहिजे ना…..

तर मंडळी, आता हे मांडे बनतात कसे ते पाहुया…

मांड्यांचे सारण आपण पुरणपोळीचे करतो तसेच करतात. चणाडाळ धुवुन चुलीवर शिजत ठेवतात, शिजली की मोठ्या चाळणीवर ओतुन पाणी पुर्णपणे काढतात आणि मग परत चुलीवर चढवुन तिच्यात गुळ घालुन गुळ शिजेपर्यंत आणि सारण थोडे सुकेपर्यंत ढवळत राहतात. गरम असतानाच पाट्यावर वाटायचे. मिक्सरवर वाटले तरी चालते. एकदम बारीक वाटले गेले म्हणजे झाले.

मांड्यांचे कवर पाहुन ते मैद्याचे केलेय असे वाटते पण ते तसे नाहीय.

अगदी उत्तम प्रतिचा लोकवण वगैरे गहु घ्यायचा, तो स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायचा आणि जात्यावर अगदी बारीक पिठ दळायचे. जर गिरणीवर दळुन आणले तरी चालते. नंतर चाळणीने चाळण्याऐवजी वस्त्रगाळ करुन घ्यायचे. पिठ वस्त्रगाळ करुन घेतले नाही तर मांडा बनवताना कडेला जाड राहतो, भाजताना कडा निट भाजल्या जात नाहीत आणि मग तेवढी गोल कड काढुन टाकावी लागते.

मग हवे तितके पिठ घेऊन थोडे तेल घालून, मीठ घालुन पाण्याने भिजवायचे. मीठ अगदी नेमके, योग्य प्रमाणात घालायला हवे, कारण कमी पडले तर मांडा करताना मोडतो. साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसे भिजवायचे नी मग त्याला तासभर तरी तेल लावुन उलटेसुलटे फिरवत तिंबत बसायचे.

तासाभराने अगदी मैद्याच्या पिठासारखा पोत आणि लवचिकपणा येतो या पिठाच्या गोळ्याला. सारणापेक्षा पिठ निट जमायला हवे, नाहीतर सगळेच ओम्फस व्हायचे. मांडा करताना मोडत असल्यास मीठ बरोबर पडले का ते चेक करतात आणि कमी असल्यास घालुन परत मळतात. मग मांडा न मोडता व्यवस्थित होतो.

पिठ भिजवणा-या आजीबाईंनी दोन चमचे पुरण टाकले पिठातआणि परत एकदा तिंबुन मग झाकुन ठेवले गोळ्याला. असे केल्याने छान लाटले जाते म्हणे.

आता पिठ आणि सारण दोन्ही तयार आहेत. तिन विटा मांडुन वेगळी चुल लावली जाते. अर्थात आज भरपुर मांडे करायचे असल्याने ही सोय केलीय. अन्यथा रोजच्याच चुलीवर खापर ठेऊन मांडे भाजायचे. हे खापर म्हणजे खास मांडे भाजण्यासाठी बनवलेलेल मातीचे भांडे! साधारण १५०-२०० रु. पर्यंत किंमत असलेले हे मडके दिसायला दोन बशा एकमेकींवर उपड्या ठेवल्या तर जशा दिसतील तसे दिसते. त्याला खालच्या बाजुने तोंड असते. तिच्यातुन धग वरपर्यंत पोचुन मांडे भाजले जातात. शहरवासिय मांडेप्रेमींसाठी गॅसवर वापरता येतील अशी लहान आकाराची खापरेही आता बाजारात मिळु लागलीत अशी माहिती आजीबाईंनी दिली.

मांड्यांचा पसारा अगदी खाली दिसतोय तसा मांडायचा आणि करायचे सुरू मांडे करायला.

र आता मांडा बनवतात कसा ते पाहु. प्रथम आपली मोठी पोळी असते त्या आकाराच्या दोन पोळ्या करुन घेतात. मग साधारण नारळाच्या आकाराचा सारणाचा गोळा घेऊन त्याला ह्या दोन पोळ्यांच्या मधे ठेवतात. बाजु हळु बंद करुन घेतात आणि मग बाजुबाजुने हळुवारपणे लाटायचं.

http://www.youtube.com/watch?v=BuTJlQbDfjo

दोन पोळ्या झाल्या की नारळाएवढे सारण घ्यायचे आणि भरायचे दोन पोळ्यांमध्ये आणि मग मांडा लाटायला घ्यायचा.

लाटताना पोळपाट न वापरता मोठे ताट उपडे घालुन त्यावर लाटतात म्हणजे मोठा पृष्ठभाग मिळतो लाटायला. लाटत लाटत ताट भरले की पोळी हळुच उचलुन हाताने फिरवायची. फिरवत फिरवत अलगद दोन्ही हात आडवे घेऊन कोपरांचा आधार द्यायचा आणि कोपराकोपरांनी मांड्याला फिरवायचे. हे काम जलद करावे लागते त्याचबरोबर जपुनही करावे लागते. जलद अशासाठी की सारण सरकून एकाच बाजुला यायला नको आणि हे करताना मांडा मोडु नये म्हणुन जपायचे.

असा तयार झालेला मांडा आता खापरावर टाकायचा. एवढा मोठा मांडा गोल आकाराच्या खापरावर अजिबात चुणी वगैरे न पाडता टाकणे ही सुद्धा एक मोठी कला आहे असे वाटले पाहुन.

मांडा खापरावरुन घसरुन पडु नये म्हणुन कधीकधी काहीतरी जड ठेवतात वर.

मग एका बाजुने भाजला की अलगदपणे आणि अतिशय वेगात तो उलटवायचा.

दोन्ही बाजु भाजल्या की खाली काढायचा आणि जरा थंड झाला की घडी घालायची. ही घडी आयताकृती घालतात. जर कोणी नुसती घडी बघितली की त्याला पत्ताच लागणार नाही हा पदार्थ गोल आहे ह्याचा.

आपण पुरणपोळीला वरुन तुप लावतो तसे मांड्यांना तुप वगैरे काही लावत नाहीत. चणाडाळ शिजवल्यावर जे पाणी काढतात त्याचीच आपण कटाची आमटी करतो तशी आमटी करतात. त्यात मांडा बुडवुन खातात. तसेच दुध थोडे आटवुन त्यात साखर घालुन बासुंदीसारखे करतात. चक्रपुजेला हे दोन प्रकार करतात आणि मांडा त्यात बुडवुन खातात.

आंब्याच्या मोसमात आमरस करायचा आणि सोबत मांडे! एरवी एक माणुस फक्त अर्धाच मांडा खाऊ शकतो एकावेळी. पण आमरस केल्यास मात्र १ ते दिड मांडा एक माणुस सहजपणे खाउन जातो अशी आमरसाची किमया आजोबांनी ऐकवली!!!!

चक्रपुजा ही घरात धनधान्य भरपुर यावे, समृद्धी यावी यासाठी केली जाते असे मला पुजेचे स्वरुप पाहुन वाटले. सांज्याच्या करंज्या करतात, त्यांना सांजोरी म्हणतात. गुळाचे पाणी घालुन गव्हाच्या गोड पु-या करतात, त्यांना सोळी म्हणतात.

पुजा मांड्ताना एका बाजुला वीटा रचुन होमाची तयारी करतात. होमापुढे तांदुळ पसरतात आणि मुठीत तांदुळ घेऊन एकात एक अशी पाच्-सात वर्तुळे काढतात. त्या वर्तुळावर घरच्या बागेतल्या आंबा, सिताफळ, लिंबु वगैरे झाडांच्या छोट्या फांद्या अंथरतात. त्यावर गोलाकारात मांडे रचतात. मधे एक आणि बाजुला गोल दहा मांडे असे अकरा मांडे रचतात. मांड्यांवर सोळी, सांजोरी लावतात. तळलेल्या कुरडया रचतात. त्यावर दहा दिवे आणि मध्ये एक मोठा दिवा (ह्याला मेंढ्या म्हणतात) असे पिठाचे दिवे ठेवतात. हे दिवेही आधी बनवुन उकडुन तयार ठेवतात.

होम पेटवल्यावर होमाच्या ज्योतीने मधला दिवा आणि बाजुचे दहा दिवे पेटवतात. मग सगळ्यांनी नमस्कार करायचा. सगळे झाले की पंगत बसते आणि मग मांड्याचा यथायोग्य समाचार घेतला जातो.

तर असे हे मांडेपुराण…. आवडले तर पुढच्या वर्षी माझ्याबरोबर चला चक्रपुजेला….

विडिओज पण घेतलेले आहेत. खाली लिंक्स दिल्यात त्या कृपया पाहा. आवाज मात्र शुन्यावर ठेवा, अर्थात ज्यांना अहिराणी बडबड ऐकायची असेल त्यांनी ऐकावी….

जरासा मोठा झाला की अलगद हातावर उचलुन घ्यायचा आणि मनगट व कोपराचा आधार देत देत मोठा करायचा. अगदी पातळ झाला की मग खापरावर टाकायचा. कधीकधी मांडा सुळ्ळकन घसरुनही पडतो खापरावरुन. तसे होऊ नये म्हणुन काहीतरी जड ठेवतात वर. फोटोत मक्याचे दाणे काढल्यावर उरलेले कांड ठेवले आहे. एरवी त्याचा उपयोग सैपाकघरात जळण म्हणुन होतो.

एक बाजु पुरती भाजली गेली की मांडा उलटवायचा. मांड्याला खालच्या बाजुला कधीकधी आंच मिळत नाही त्यामुळे जळते लाकुड घेऊन त्याचा शेक देतात. दोन्ही बाजु शेकल्या की उतरवायचा आणि घडी घालायची.

मला मांडे करुन पाहण्याचा खुप आग्रह झाला. पण इतक्या बायकांच्या फौजेसमोर आपले पितळ उघडे पडु नये म्हणुन मी नम्रपणे नकार दिला….   🙂

(मायबोली.कॉम वर पुर्वप्रकाशित. http://www.maayboli.com/node/12329)

अपेक्षा

माझी एक्स-पर्सनल ट्रेनर तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेली. खुप छान नी सुंदर मुलगी. चांगले विचार बाळगणारी नी त्यांच्यावर ठाम राहणारी. तिचे लग्न जमायच्या नी त्याआधीच्या काळात ब-याच वेळा बोलायची ती लग्नाबद्दल. मला म्हणाली, ‘मी यांना आधीच सांगितलेय की माझ्या त्यांच्याकडुन काहीच अपेक्षा नाहीयेत.’ तिचे म्हणणे मी तेव्हा फारसे मनावर घेतले नाही. पण कुठेतरी मला हे काहीही अपेक्षा न ठेवणे खटकले. काहीच अपेक्षा नाहीत मग त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही का जाताय? आणि जरी म्हटले काहीच अपेक्षा नाहीत तरी या माणसाबरोबर आपले आयुष्य शांतपणे जावे ही अपेक्षा तर आहेच ना?

या अपेक्षाप्रकरणावर जसजसा विचार करत गेले तसे हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात यायला लागले. किती सहजतेने आपण म्हणतो की माझ्या तुझ्याकडुन काही अपेक्षा नाहीयेत. पण हे म्हणतानाही किती अपेक्षा असतात! अगदी एक दिवसाच्या बाळाच्याही अपेक्षा असतात की पोटात भुक लागली की तोंडात दुध मिळावे. नाही मिळाले की बघा कसा तो अर्ध्या रात्री बोंबाबोंब करुन सगळ्यांची झोप उडवतो ते. त्याला कुठे माहित असते हे अपेक्षाप्रकरण? तरीही अपेक्षा असतेच ना?

आणि का नसावी अपेक्षा? कळायला लागल्यापासुन आपण इतरांपासुन आणि आपल्यापासुनही अपेक्षा ठेवायला लागतो. इच्छा या शब्दाबरोबर अपेक्षा या शब्दाचे लग्न उगीच लागलेले नाही. आई मुलांवर निरपेक्ष प्रेम करते, अमुकतमुक समाजसेवक लोकांची निरपेक्ष सेवा करतात इ.इ. वाक्ये खोटी आहेत हो! मुलांवर निरपेक्ष प्रेम करताना आपल्या मुलांचे भले व्हावे ही अपेक्षा आईने मनी बाळगलेली असतेच की. आजा-यांची निरपेक्ष सेवा करणा-याच्या मनात हा आजारी लवकर बरा व्हावा ही अपेक्षा असतेच की. आता तुम्ही भलेही त्याला इच्छा म्हणा. पण इच्छा ही कुठे अपेक्षेपेक्षा वेगळी आहे? इच्छा नी अपेक्षा एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. मग निरपेक्ष काय आहे जगात? माझ्या मते काहीही नाही. सर्वसंगपरित्याग केलेल्या साधुंचीही ‘आता जन्ममरणाच्या फे-यातुन सुटका व्हावी नी मोक्ष मिळावा’ ही अपेक्षा असतेच. जन्माला येताच अपेक्षांचे डोंगर मनात उभे रहायला लागतात, हे डोंगर फक्त मृत्यूच कोसळवतो.

आपल्याला जन्मापासुन चिकटलेल्या ह्या अपेक्षांना आपण आपल्यावर कितपत अधिकार गाजवायला देणार यावर आपले या जन्मातले सुख-दु:ख अवलंबुन आहे. आपल्या अपेक्षांचा प्राधान्यक्रम (priorities) आपण आपल्या नकळतच ठरवलेला असतो. आता या अपेक्षा ज्यांच्याकडुन आहेत त्यांचा प्राधान्यक्रमही आपल्या प्राधान्यक्रमाशी जुळला तर आयुष्य सुखात जाणार, नाहीतर…… पण हे नाहीतरच जास्त करुन आपल्या वाट्याला येते कारण दोन माणसांचा प्राधान्यक्रम कधी जुळत नाही. मग एका कुटूंबात राहणा-या ५-६ जणांचा प्राधान्यक्रम कसा काय जुळणार? तरी बरे, एका बाजुने लोक आपल्या प्राधान्यक्रमाविषयी जागरुक व्हायला लागलेत त्याचवेळी कुटूंबातल्या लोकांची संख्या कमी व्हायला लागलीय. आजपासुन १०० वर्षांपुर्वी जेव्हा एका कुटूंबात कमीतकमी ५० माणसे असायची तेव्हा जर प्रत्येकजण आपल्या अपेक्षांचे बोजे दुस-यावर टाकुन त्याचा नी माझा प्राधान्यक्रम जुळावा अशी अपेक्षा करत बसला असता तर लोकांचे एकुणच जीवन किती दु:खी झाले असते. पण तेव्हा कुटूंबातल्या माणसांची संख्या जास्त असली तरी त्यात प्राधान्यक्रम बाळगणा-या लोकांची संख्या खुपच कमी असायची. अशा लोकांना तेव्हा कुटूंबप्रमुख म्हणुन ओळखले जात असे आणि इतर मंडळी कुटूंबप्रमुखाच्या प्राधान्यक्रमाशी आपला प्राधान्यक्रम गुपचुप जुळवुन घ्यायची. 🙂 आजच्यासारखे घरातल्या प्रत्येकाचा स्वतंत्र प्राधान्यक्रम ही चैन तेव्हा लोकांना माहितही नव्हती, त्यामुळे ती परवडायची चिंता कोणी केली नाही.

पण आजच्या जगात मात्र आपणाला स्वतःचा प्राधान्यक्रम जपायचा आहे, घरातल्यांनी नी जमले तर बाहेरच्यांनीही आपल्या प्राधान्यक्रमाला प्राधान्य द्यावे ही अपेक्षाही असते सोबत. प्रत्येकाची हीच इच्छा. आणि जितकी ही इच्छा तीव्र तितकी कोणाला माझे काहीच पडले नाहीय ही भावना प्रबळ होत जाते. मग सुखात आयुष्य घालवायचे, आनंदात स्ट्रेसफ्री जगायचे इ.इ. गोष्टींचे काय? आपल्या प्राधान्यक्रमाला इतरजण केराची टोपली दाखवताहेत हे पाहिल्यावर स्ट्रेसफ्री जगणे शक्य तरी आहे का? 🙂

आहे शक्य. जरा मी, माझे, माझा आनंद, मला हे वाटते, माझे हे मत आहे ह्या म ने सुरू होणा-या गोष्टी बाजुला ठेवल्या नी दुस-याचा प्राधान्यक्रम काय आहे ह्याच्याकडे लक्ष दिले तर त्याच्या प्राधान्यात आपल्या गोष्टी सहज मिसळून देता येतील.

लग्नाआधी तासनतास फोनवर बोलणा-या प्रियकराचा नवरा झाल्यावर त्याला दिवसातुन एकदोनच फोन करायला वेळ मि़ळायला लागला म्हणुन त्याचा फोन येताच बायको त्याच्यावर रागावू लागली तर एक-दोन फोन येतात तेही यायचे बंद होतील. 🙂 अशा वेळी त्याला मी रोज अमुक वाजता फोन करेन असे सांगुन आपणच फोन करणे श्रेयस्कर ठरेल. त्याने आधीसारखाच फोन करत राहिले पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर भयानक भडकण्याशिवाय आपल्या पदरात काहीही पडणार नाही. त्याचा प्राधान्यक्रम आता बदललाय हे गुपचुप मान्य करुन टाकावे 🙂

जोक्स अपार्ट, आपण जर दुस-याच्या अपेक्षा काय आहेत ते बघुन त्याप्रमाणे वागायला लागलो तर घरातले तापमान बरेचसे आटोक्यात राहिल आणि आपल्याला हवे ते सुख, शांती, आनंद स्वतःहुन आपल्या दारात येतील. यासाठी गरज आहे जरा पेशन्स ठेवायची. वर लिहिल्याप्रमाणे ‘म’ने सुरू होणा-या गोष्टी बाजुला ठेवायच्या नी दुस-याची अपेक्षा काय ते पाहायचे. समोरचा माणुस जे काय वागतोय ते असे का वागतोय ह्याचा विचार करायची सवय लावायची. त्याच्या बाजुने विचार करुन पाहायचा. हे सुरवातीला खुपच कठीण जाईल. अचानक आपण कोणीच नाही आहोत, आपल्याला कोणी महत्त्व देत नाहीये, सगळे आपापल्या जगात मश्गुल आहेत, मी जगतेय की मरतेय हेही पाहायला कोणाला वेळ नाहीय अशा भावना वारंवार दाटून येतील. पण परत तेच…. पेशन्स ठेवायचा. हळुहळू इतरांचा प्राधान्यक्रम आपल्याला थोडाफार आपल्यासाठीही अ‍ॅडजस्ट करता येतो. आणि करता नाही आला तर निदान दुस-याचा प्राधान्यक्रम काय आहे ते कळते, आपण त्यात कुठे बसतो तेही कळते आणि मग उगीचच फुकटच्या अपेक्षा ठेऊन आपण आपला नी त्याचा दोघांचाही दिवस खराब करत नाही. अगदीच सुखात राहिलो नाही तरी स्ट्रेसफ्री तरी नक्कीच राहतो.

मी हे करुन पाहिले आणि यश मिळवले. अगदी १००% नाही, पण माझा स्ट्रेस ब-याच प्रमाणात कमी केला. तुम्हीही पाहा करुन. 🙂

आरसा

आज ब-याच दिवसांनी आरश्यात डोकावले. भुरभूरीत पांढ-या केसांची, तेलकट कळाहिन चेह-याची एक पन्नाशीची वृद्धा माझ्याकडे पाहात होती. अरे देवा, माझे हे ध्यान कधी झाले? आणि हे होईपर्यंत मी स्वतःकडे पाहिलेच नाही की काय? काय करते काय मी दिवसभर?

खरेच काय करते मी दिवसभर? रात्री झोपताना दिवसभर काय काय केले त्याची यादी केली तर दखल घेण्याजोगे असे काहीही आढळत नाही. रोजचे उठले, ऑफिसात गेले, घरी आले, जेवले नी परत झोपले हे असते. तोंडाने सतत मला मेंदी घालायचीय डोक्यात, बरेच दिवस कुकूंबर क्रिम मसाज केला नाहीय, आज खुप तेलकट वाटतेय, मुलतानी माती लावायला पाहिजे चेह-यावर, टॉयलेट फ्लश खराब झालाय, प्लंबर बघायला हवा वगैरे वगैरे बडबड चालु असते. पण ह्यातल्या किती गोष्टी मी वेळच्यावेळी, ठरवलेल्या वेळी करते? केसात मेंदी घालुन दोन महिने झालेत, फ्लश खराब होऊन ६ महिने झालेत. पाण्याची टाकी वर्षभर गळतेय… एक का दोन.. अनंत कामे नी सगळी ‘आज नको, उद्या करुया….’ ह्या आश्वासनावर खोळंबलीत.

सकाळी उठताउठताच ७ वाजतात. उठल्यावर लगेच ‘श्श्यी, किती हा उशीर उठायला, आज नको वॉकिंग, उद्या जाऊया’ हीच सुरवात. मग चहा हवाच. ऋजूता दिवेकरने सांगितलेय, सकाळची सुरवात चहाने नको, फळ खा. पण सकाळी ७ वाजता फळे खाण्यासाठी आदल्या दिवशी ती बाजारातुन आणावी लागतात. फळे फ्रिजमध्ये आपोआप लागत नाहीत! मग ‘डायट उद्यापासुन, आज घेऊ चहाच. नाहीतरी पोट रिकामे ठेवायचे नाही असाची एक डायेट फंडा आहेच’ असे म्हणत चहा घ्यायचा नी करायची दिवसाची सुरवात. आणि मग सुरवातच अशी उत्तम झाल्यावर पुढचा दिवस कसा जाणार लोकहो? तो अर्थातच त्याच्या पायाने जातो. मी सगळ्या गोष्टी ‘आज नको, उद्या….’ करत राहते. आता हा उद्या कधी येणार?

माझ्या ह्या आळशीपणाने माझे अनंत नुकसान केलेले आहे. पण मी सुधारले मात्र नाहीय. मागच्या पानावरुन प्रकरण पुढे चालुच. कधीकधी ‘आपण आळशीपणा खुप करतो’ हा भुंगा मनाला कुरतडायला लागतो नी मग दोन दिवस काय मस्त जातात. ज्यांचे ग्रह उच्चीचे आहेत अशी सगळी कामे मला आठवतात नी मी ती धडाधड करुन टाकते. दोन दिवसातच उसने अवसान ओसरुन जाते नी परत मागच्या पानावरुन प्रकरण पुढे चालुच….

मी प्रत्येक कामात अशी चालढकल करत राहिले तर माझ्या मुलीचे काय? ती रोल मॉडेल म्हणुन माझ्याकडेच पाहणार ना? मी आजचे उद्या करायचे नी तिने मात्र सगळे वेळच्यावेळी करावे म्हणुन रागे भरायचे याला काय अर्थ?

तर मंडळी, आजचा माझा संकल्प हाच की आजपासुन आळसाला एक सणसणीत लाथ.

आजपासुन कल करेसो आज और आज करेसो अब हाच मंत्र….

मग बघते आरशात डोकावुन आणि कोणीतरी ब-यापैकी दिसणारी माझ्याकडे पाहात असेल अशी अपेक्षा ठेवते.

बालगंधर्व

कालच ‘बालगंधर्व’ हा मराठी चित्रपट पाहिला. चहुकडुन या चित्रपटाविषयी इतके काही चांगले ऐकायला येत होते की उत्सुकता अगदी ताणलेली. काल ऐशूशी बोलताना बालगंधर्वचा विषय काढल्यावर ती लगेच म्हणाली, ‘सुबोध भावे असाच इतका गोड्डुला दिसतो, तो बाईच्या वेशात किती गोड्डुला दिसेल!’ आणि खरेच सुबोध बाईच्या वेषात अगदी गोड, सुंदर, मँगोचिजकेक सारखा आकर्षक दिसलाय.

चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अतिशय सुंदर झालीय. बाह्यचित्रणही एकदम नयनरम्य. बालगंधर्व तळ्याकाठी बसुन भजन गातात ते दृष्य कमालीचे देखणे झालेय.

पण चित्रपट पाहताना बरेच प्रश्न पडतात. लेखकाने लोकांना बालगंधर्वांचा आयुष्यपट माहित आहे असे समजुन लेखन केले असावे.

बालगंधर्व हे नाटकाकडे कला म्हणुन पाहात होते. त्यातुन अर्थार्जन करावे हे त्यांच्या डोक्यात कधी आलेच नाही. इतरांनी त्यातुन अर्थार्जन केले तर त्यांनी त्याला नाही म्हटले नाही, पण स्वतः मात्र पैशांच्या बाबतीत खुपच उदासिन राहिले. हे असे का? हा प्रश्न चित्रपट पाहताना वारंवार मनात येतो. त्याचे काहितरी उत्तर मिळायला हवे होते.

एकवेळ मी उपाशी राहिन पण भामिनी, रुक्मिणी, सुभद्रा भरजरी शालुंमध्येच दिसायला पाहिजेत हे मत ठामपणे मांडणारे बालगंधर्व यासाठी लागणारे पैसे कसे येतील याचा विचार करत नाहीत याचे जरासे आश्चर्य वाटते. एकदा सोडुन अनेकदा विश्वासघात झाल्यावरही ते नव्याने विश्वास कसे काय टाकु शकत होते हे कळत नाही. गौहरकडे राहायला जाण्याआधी त्यांचे घरातल्यांशी संबंध कसे होते हेही चित्रपटातुन कळत नाही. त्यांच्या या सगळ्या निर्णयामागची मानसिकता समोर यायला पाहिजे होती असे चित्रपट पाहताना खुप वाटत राहते. चित्रपटाने केवळ ‘जे घडले ते असे घडले’ ही भुमिका घेऊन त्यांच्या आयुष्याचा पट मांडला. असे का घडले असावे हे चित्रपटात कुठेही येत नाही. बालगंधर्वांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल खुपच कमी वाचनात आलेय, त्यामुळे ह्याची उत्तरे कुठे कोणी लिहिली असतील की नाही देव जाणे.

पण शीतल तेजाने चमकणा-या चंद्रासारखे दिसणारे बालगंधर्व स्टेजवर पाहिले की हे सगळे प्रश्न मागे पडतात. बालगंधर्वांच्या एकुणच व्यक्तिमत्वात लहान मुलाचा भाबडेपणा, निष्पाप, निरागस वृत्ती दिसते. सुबोध भावेने बालगंधर्व साकारले म्हणवत नाही. तो ही भुमिका अक्षरक्षः जगलाय. राजाश्रय आनंदाने स्विकारणारे पण लोकांनी मदत म्हणुन देऊ केलेली थैली ‘ती तर भिक्षा होईल ना?’ म्हणुन नाकारणारे बालगंधर्व साकारताना कुठेही चेह-यावर मोठेपणाचा आव आणलेला नाही. त्यांचे एकुण व्यक्तीमत्व पाहता ज्या नैसर्गिकपणे त्यांनी थैली नाकारली असेल त्याच भावासकट सुबोधने तो प्रसंग उभा केलाय. धैर्यधराचा भुमिकेतल्या केशवराव भोसल्यांचे जोडे पुसणारी भामिनीही तशीच.. मुळ प्रसंगातही बालगंधर्व असेच दिसले असतील असे वाटते सुबोधचे बालगंधर्व पाहताना.

पुनश्चः हरी ओम..

माणसाने किती आळशी नसावे हे जाणायचे असेल तर माझ्याकडे खुश्शाल पाहावे. माझ्याइतकी आळशी मीच असेन. किती दिवस इथे लिहिन, लिहिन म्हणतेय, पण लिहित मात्र काहीच नाही. इथे लिहायचा उद्धेश काय ते अगदी ठळठळीतपणे लिहुन ठेवलेय ‘माझ्याविषयी’मध्ये (अर्थात माझ्यासाठीच लिहिलेय ते…). पण लिहित मात्र काहीच नाही.

पण आजपासुन मात्र लिहिणार. समर्थांचा आदेशच आहे – दिसामाजी काहीतरी लिहित जावे.

इथे काहीही लिहिणे कठिण आहे. मोबाईल सतत वाजत असतो. आता अशीच लेखनसमाधी लावुन बसलेली असताना तो मेला परत वाजला. मैत्रिणीचा फोन. मला तिने सकाळीच कामाला लावलेले, पण मी आळशी. आता जा लवकर, माझे काम कर म्हणुन ती मला दम भरत होती तेव्हा मी तिला ‘मी साहित्य प्रसवतेय’ हे शुभवर्तमान कळवले. आता हे साहित्य वगैरे कसे प्रसवायचे ते मला काय माहित नाही, पण लेखक मंडळी मधुन मधुन साहित्य प्रसवत असतात हे वाचुन असल्याने (पाहा, पाहा, लिहित नसलो तरी आमचे वाचन मात्र मजबुत आहे हो…) फेकला तिच्या तोंडावर डायलॉग. तो तसाच आपटुन परत माझ्या तोंडावर येऊन आदळला.

काय करतेय्स??
साहित्य, साहित्य प्रसवतेय…..
काय सांगतेय? नॉर्मल डिलिवरी की सिजर??

घ्या, आता लेखक मंडळींची डिलीवरी नॉर्मलच असणार… ते जन्मजात प्रतिभावंत! पण आमचे काय? शेवटी आता सिजर करायचीच वेळ आलीय. कंटाळा दुर सारुन लिहायचे ठरवल्यावर नॉर्मल डिलीवरी कशी होणार? सिजरच हवे. तर बघते आता काय प्रसवु शकते ते. आधी डब्बा खाऊन घेते…