बालगंधर्व

कालच ‘बालगंधर्व’ हा मराठी चित्रपट पाहिला. चहुकडुन या चित्रपटाविषयी इतके काही चांगले ऐकायला येत होते की उत्सुकता अगदी ताणलेली. काल ऐशूशी बोलताना बालगंधर्वचा विषय काढल्यावर ती लगेच म्हणाली, ‘सुबोध भावे असाच इतका गोड्डुला दिसतो, तो बाईच्या वेशात किती गोड्डुला दिसेल!’ आणि खरेच सुबोध बाईच्या वेषात अगदी गोड, सुंदर, मँगोचिजकेक सारखा आकर्षक दिसलाय.

चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अतिशय सुंदर झालीय. बाह्यचित्रणही एकदम नयनरम्य. बालगंधर्व तळ्याकाठी बसुन भजन गातात ते दृष्य कमालीचे देखणे झालेय.

पण चित्रपट पाहताना बरेच प्रश्न पडतात. लेखकाने लोकांना बालगंधर्वांचा आयुष्यपट माहित आहे असे समजुन लेखन केले असावे.

बालगंधर्व हे नाटकाकडे कला म्हणुन पाहात होते. त्यातुन अर्थार्जन करावे हे त्यांच्या डोक्यात कधी आलेच नाही. इतरांनी त्यातुन अर्थार्जन केले तर त्यांनी त्याला नाही म्हटले नाही, पण स्वतः मात्र पैशांच्या बाबतीत खुपच उदासिन राहिले. हे असे का? हा प्रश्न चित्रपट पाहताना वारंवार मनात येतो. त्याचे काहितरी उत्तर मिळायला हवे होते.

एकवेळ मी उपाशी राहिन पण भामिनी, रुक्मिणी, सुभद्रा भरजरी शालुंमध्येच दिसायला पाहिजेत हे मत ठामपणे मांडणारे बालगंधर्व यासाठी लागणारे पैसे कसे येतील याचा विचार करत नाहीत याचे जरासे आश्चर्य वाटते. एकदा सोडुन अनेकदा विश्वासघात झाल्यावरही ते नव्याने विश्वास कसे काय टाकु शकत होते हे कळत नाही. गौहरकडे राहायला जाण्याआधी त्यांचे घरातल्यांशी संबंध कसे होते हेही चित्रपटातुन कळत नाही. त्यांच्या या सगळ्या निर्णयामागची मानसिकता समोर यायला पाहिजे होती असे चित्रपट पाहताना खुप वाटत राहते. चित्रपटाने केवळ ‘जे घडले ते असे घडले’ ही भुमिका घेऊन त्यांच्या आयुष्याचा पट मांडला. असे का घडले असावे हे चित्रपटात कुठेही येत नाही. बालगंधर्वांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल खुपच कमी वाचनात आलेय, त्यामुळे ह्याची उत्तरे कुठे कोणी लिहिली असतील की नाही देव जाणे.

पण शीतल तेजाने चमकणा-या चंद्रासारखे दिसणारे बालगंधर्व स्टेजवर पाहिले की हे सगळे प्रश्न मागे पडतात. बालगंधर्वांच्या एकुणच व्यक्तिमत्वात लहान मुलाचा भाबडेपणा, निष्पाप, निरागस वृत्ती दिसते. सुबोध भावेने बालगंधर्व साकारले म्हणवत नाही. तो ही भुमिका अक्षरक्षः जगलाय. राजाश्रय आनंदाने स्विकारणारे पण लोकांनी मदत म्हणुन देऊ केलेली थैली ‘ती तर भिक्षा होईल ना?’ म्हणुन नाकारणारे बालगंधर्व साकारताना कुठेही चेह-यावर मोठेपणाचा आव आणलेला नाही. त्यांचे एकुण व्यक्तीमत्व पाहता ज्या नैसर्गिकपणे त्यांनी थैली नाकारली असेल त्याच भावासकट सुबोधने तो प्रसंग उभा केलाय. धैर्यधराचा भुमिकेतल्या केशवराव भोसल्यांचे जोडे पुसणारी भामिनीही तशीच.. मुळ प्रसंगातही बालगंधर्व असेच दिसले असतील असे वाटते सुबोधचे बालगंधर्व पाहताना.

Advertisements

संगीत बया दार उघड

महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभली आहे असे नेहमी कानावर पडते. संत म्हटले की आठवतात ते ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव.. अजुन थोडे आठवायचा प्रयत्न केला तर सावता, चोखोबा, गोरा हेही आठवतात. स्त्री संत मात्र मुद्दाम आठवाव्या लागतात आणि ती आठवणही मुक्ताई-जनाबाईपासुन सुरू होऊन कान्होपात्रेकडे संपते. या दोघीतिघींव्यतिरीक्त अजुन काही स्त्री संत होऊन गेल्यात का हेही माहित नसेल.

अशा वेळी आविष्कार निर्मित, सुषमा देशपांडे संकल्पित-लिखित-दिग्दर्शित ‘संगीत बया दार उघड’ हे नाटक बघायचा योग आला आणि त्याद्वारे अजुन काही संत स्त्रियांशी ओळख झाली.

हे नाटक म्हणजे संत स्त्रियांच्या रचना लोकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या रचनांतुन त्या काळची समाजव्यवस्था आणि स्त्रियांचे त्या व्यवस्थेतले स्थान याचाही एक मागोवा घेता येतो.

तेराव्या शतकातल्या मुक्ताबाईपासुन एकोणिसाव्या शतकातल्या गोदामाईपर्यंतचा प्रवास या नाटकात रेखाटलेला आहे. त्यात नावाप्रमाणेच मुक्त असलेली मुक्ताई आहे जी खुलेपणाने म्हणते की

मी सद्गुरूची लेक भाव एक
बाई मी नि:संग धांगडी|
फेकिली प्रपंच लुगडी
नाकी नाही नथकडी|

विठ्ठलाला आपला सखा, मैत्रिण, आई मानणारी
माय गेली, बाप गेला
आता सांभाळी विठ्ठला|
मी तुझे गा लेकरू
नको मजशी अव्हेरू|
असे आळवणारी जनाबाई यात आहे. नव-यालाच देव मानणारी

भ्रताराची सेवा तोची आम्हा देव
भ्रतार स्मयमेव परब्रम्ह|

असे म्हणणारी बहिणा आहे, तर त्याच वेळी नव-याचे अत्याचार सहनशक्तीपलिकडे गेल्यावर त्याला

तुझी सत्ता आहे देहावरी समज
माझेवरी तुझी किंचित नाही|

असे स्पष्टपणे ठणकावणारी विठाही आहे.

या स्त्रियांचे शिक्षण झाले का वगैरे माहिती नाटकात येत नाही. समाजातल्या सगळ्या वर्गांचे प्रतिनिधित्व यात येते, त्यामुळे केवळ उच्चवर्णिय असल्यामुळे त्यांनी एवढे ज्ञान मिळवले असेही वाटत नाही. अशा वेळी जेव्हा सोयरा म्हणते की

देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध|
देहीचा विटाळ देहीच जन्मला
सोवळा तो झाला कवणधर्म|
विटाळावाचोनी उत्पत्तीचे स्थान
कोण देह निर्माण नाही जगी|

तेव्हा आश्चर्य वाटते.

स्त्रियेचे शरीर पराधिन देह
न चलावे उपाय विरक्तीचा|

असे माननारी बहिणा, तिचा नवरा ब्राम्हण्याचा अहंकार बाळगतो म्हणुन त्याला

ब्रम्हभाव देही सदासर्वकाळ
ब्राम्हण केवळ तोची एक
बहिणी म्हणे कामक्रोध सर्व गेले
तेथेची राहिले ब्राम्हणत्व

हेही सुनावते. यापैकी काही स्त्रिया विवाहित होत्या, तर काही अविवाहित. कान्होपात्रा तर चक्क नायकिण. पण या सगळ्यांची भक्ती विठ्ठलावर आणि त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवणा-या त्यांच्या गुरूवर. त्यांच्यालेखी जो गुरू तो इतरांलेखी परपुरूष. त्या काळच्या समाजात गुरूभक्ती पर्यायाने परपुरूषभक्ती करणा-या या स्त्रियांवर समाजाने दोषारोप केले, घरच्यांनी त्रास दिला. पण या सगळ्या त्रासाला पुरून उरल्या आणि त्यांच्या मनाने आणि गुरूने त्यांना दाखवलेल्या मार्गावरुन चालत राहिल्या.

यातल्या काही स्त्रिया या संत पुरूषांची पत्नी, आई, बहिण या स्वरुपात पुढे येतात. संत तुकारामाच्या संसाराबद्दल, त्याच्या बायकोच्या त्राग्याबद्दल थोडीफार माहिती लोकांना आहे पण इतर संत पुरूषांच्या कुटूंबियांनाही असा त्रास झाला असेलच ना? दिवसभर ‘विठ्ठल विठ्ठल’ करत देवाचरणी लीन झालेल्या नामदेवाला पाहुन गोणाई, त्याची आई प्रत्यक्ष विठ्ठलालाच

अगा ये विठोबा, पाहे मजकडे
का गा केले वेडे बाळ माझे?
तुझे काय खादले? त्वा काय दिधले?
भले दाखवले देवपण
आम्ही म्हणु तु रे कृपाळू असशी
आता तु कळलासी, पंढरीराया
का रे देवपण आपुले भोगू पै जाणावे
भक्ता सुख द्यावे हेळामात्रे
देव, देव होऊनिया अपेश का घ्यावे?
माझे का बिघडावे, एकुलते बाळ?

असे सुनावते. तर नामदेवाची बायको राजाई थेट रुक्मिणीलाच साकडे घालते.

दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत
राजाई वृतांत सांगे माते
अहो रखुमाबाई विठोबासी सांग
भ्रतारासी का गा वेडे केले?
सदैवाच्या स्त्रिया अलंकार मंडीत
मजवरी नाही प्रित काय करु?
एकि दिव्य वस्त्रे नेसल्या परिकर
मज खंडे जर्जर मिळालेलें
शिकवा वो रुख्माई आपुलिया कांता
का आम्हा अनाथा कष्टवितो
जन्मोनिया आमुची पुरविली पाठी
मोडिली राहाटी संसाराची.

संत स्त्रियांचा आजवरचा हा प्रवास ‘संगीत बया दार उघड’ या नाटकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि कलाकारांनीही तो अगदी ताकदीने सादर केला आहे. संगीत नाटक असल्याने त्यात गाणी आहेत. टिपिकल अभंगाच्या चाली न लावता अर्थाशी सुसंगत अशा गोड श्रवणीय चाली श्री. देवदत्त साबळे यांनी दिल्या आहेत. नाटकात ही गाणी गाण्यासाठी तबला पेटी आणि गायिकांसहित संच जरी असला तरी त्यात भुमिका करणा-या मुलींनीही मुळ गायिकेबरोबर ही गाणी गायली आहेत. गायिका तेजस्विनी इंगळेने अतिशय सुंदररित्या गाणी सादर केली आहेत. गीता पांचाळ, नंदिता धुरी, प्रज्ञा शास्त्री व शिल्पा साने यांनी वेगवेगळ्या संत स्त्रिया साकारल्या आहेत व त्यांना राजश्री देशपांडे, गौरव सातव व पराग सारंग यांनी साथ केली आहे.

संत स्त्रियांवर आधारीत असे काही कथानक अडिज तासात बसवणे तसे कठीणच, त्यात ८-९ शतकातल्या सगळ्यांच स्त्रियांचा समावेश कदाचित होऊ शकलाही नसेल. पण जे काही लेखिकेने मांडले आहे त्यात या स्त्रियांची विठ्ठलभक्ती तर दिसतेच पण त्या विठ्ठलाकडे काय नजरेने पाहतात तेही दिसते. गोदामाई स्वतःला दास म्हणवते. ती स्त्री-पुरूष भेद मानत नाही. जनाला स्वतःमध्ये विठ्ठल दिसतो. कान्होपात्रा राजाच्या महालात बटीक होऊन राहण्यापेक्षा विठ्ठल चरणी प्राण देणे स्विकारते. सोयराला विठ्ठल म्हणजे निवांतपणी गुजगोष्टी करणारा मित्र वाटतो.

तरीही नाटक पाहताना एक प्रश्न मनात येतो की या सगळ्या स्त्रियांनी विठ्ठलाच्या चरणीच का धाव घेतली? संसाराच्या चक्रात पिळवटुन निघाल्यावर एक आसरा म्हणुन त्या विठ्ठलाकडे गेल्या की मुळातच त्यांच्यात भक्तीभाव होता? कुठेतरी असे वाटते की या स्त्रियां रुढार्थाने कदाचित अडाणी असतील, संसारात गांजल्या असतील, पण यांच्या मनातला भक्तीभाव अभेद होता. विठ्ठलाच्या दर्शन झाले की आपली सगळी दु:खे नष्ट होतील हा विश्वास होता. आणि या विश्वासाच्या जोरावर त्या स्वतःच विठ्ठलाच्या बरोबरीच्या झाल्या.

आविष्कारने हे नाटक चेतन दातार स्मृतीदिनी (२ ऑगस्टला) पहिल्यांदा सादर केले. गेल्या आठवड्यात प्रतिबिंब फेस्टिवलमध्येही या नाटकाचे प्रयोग झाले.