नेमेची येतो मग उन्हाळा आणि सोबत मसाला

मार्च एप्रिल जवळ यायला लागला की एके दिवशी आई फोनवर सुतोवाच करते, ‘तुझा मसाला किती उरलाय? माझा संपत आलाय, आता करायला पाहिजे.’ मी फ्रिजमधुन मसाल्याची बरणी बाहेर काढते आणि पाहते. अरे देवा, आत्ता तर केला होता, इतक्यातच संपला??? बाईला सांगायला पाहिजे, जरा कमी वापरत जा गं बाई, मिरच्या महागल्या.

मग परत आईला फोन, ‘माझाही संपत आला गं…’
‘काय? दोन किलो केलेलास ना तुझ्यासाठी? दोन माणसांना दोन किलो संपतो वर्षात?’
‘अगं, मी त्या हिला दिला थोडा.’
‘ह्म्म.. वाटण्यातच संपव निम्मा’.
‘मग? वाटुन संपवला नाही तर दरवर्षी नविन कसा काय बनवता येणार?’
‘बरे, तुझ्या वहिन्यांना विचार, त्यांचा आहे का संपलाय तो.’

मग लगेच मी माझ्या वहिन्यांना फोन करुन परत सगळे संवाद रिपिट…… शेवटी एकदाचे ठरते कोणाला किती किलो हवाय ते. माझ्याकडे मिरच्या सुकवायला जागा आहे आणि वाशीचे एपिएम्सी मार्केट घराजवळ आहे त्यामुळे दरवर्षी मसाला माझ्याकडेच बनवला जातो. ज्याने त्याने जेवढा हवा तेवढा आधीच सांगायचा. मग एके शुक्रवारी संध्याकाळची आई अवतरते माझ्या घरी. बोरिवली ते बेलापुर येणे हे तिच्यासाठी जगाच्या या टोकापासुन ते त्या टोकापर्यंत जाण्यासारखे आहे. मग रात्री उशिरापर्यंत उद्या काय काय घ्यायचे त्याची यादी बनते. शनिवारी सक्काळीच उठुन आमची वरात एपिएम्सीच्या मार्केटात.

दोनेक तास लागुन सगळी खरेदी.. मग दुपारी घरी आल्यावर आईची अगदी घाई उडते. लगोलग मिरच्या वाळत टाकणार.
‘अगं, कर आरामात. कशाला घाई करतेस?’.
‘आता मसाला होईपर्यंत मी काही आराम करत नाही बघ. आणि जरा उन दाखवले की मिरच्यांचा कुटाणा पडत नाही गं.’
असे बोलत बोलत ती एक उन दाखवुन मिरच्यांचे देठ काढते. रविवारी सक्काळी उठुन परत एकदा मिरच्यांना उन दाखवायचे.

सोमवारी सकाळी उठुन मसाल्याच्या मिरच्या भाजायला घ्यायच्या. ज्यांना सर्दी झालीय त्यांनी यावे अशा वेळी घरी. सटासट शिंका येऊन सगळी सर्दी पळेल 🙂

सगळे भाजुन झाले की मग वरात डंकनच्या दारात. मसाला हा नेहमी कुटलेलाच बरा. मशिनने दळलेल्या मसाल्याला रंग येत नाही इती आईसाहेब. डंकनच्या मालकिणीला त्या दिवसांमध्ये भलताच भाव चढलेला असतो. आदल्या दिवशी नंबर लावला तरच दुस-या दिवशी मसाला कुटुन मिळायची आशा.

कुटलेला मसाला घरी आला की ऑर्डरप्रमाणे त्याचे हिस्से करायचे. सगळ्यांच्या मसाल्यात हिंग पुरून ठेवायचे. हे सगळे काम आई अगदी मन लावुन करते. मग तिला परत बोरीवलीला जायचे वेध लागतात.
‘अगं आल्यासारखी रहा आठवडाभर’.
‘अगं नको, इतके दिवस राहिले, निखिल आठवण काढत असेल आता.’
असे म्हणुन तिच्या वाट्याचा मसाला डब्यात घेऊन ती परतते.

तर मंडळी, दरवर्षी माझ्या घरी बनणारा हा मालवणी मसाला. माझ्या आईची ही रेसिपी –

जिन्नस:
बेडगी मिरची १ किलो
जाडी मिरची १/२ किलो (तिखटपणासाठी)
काश्मिरी मिरची १/४ किलो (लालभडक रंगासाठी)
धणे १/४ किलो
खसखस १/४ किलो
दालचिनी २० ग्रॅम
लवंग २० ग्रॅम
मिरी २० ग्रॅम
सफेद जायपत्री १० ग्रॅम
जायफळ २ नग
हळकुंडे १०० ग्रॅम
जिरे ५० ग्रॅम
शाहजिरे १० ग्रॅम
चक्रफुल १० ग्रॅम
दगडफुल १० ग्रॅम
मसाला वेलची १० ग्रॅम
तमालपत्र १० ग्रॅम
बडिशेप १०० ग्रॅम
खड्याचा हिंग १०० ग्रॅम

क्रमवार पाककृती:
१. मिरच्यांना दोन-तीन तास उन दाखवावे. मग हाताने देठ तोडुन, साफ करुन अजुन दोन दिवस उन्हात वाळवाव्या. चांगल्या कडक व्हायला पाहिजेत. मिरची हाताने तोडल्यास कटकन तुटली पाहिजे.

२. मिरच्या आणि इतर सर्व साहित्य वेगवेगळे भाजुन घ्यावे. भाजताना आवश्यक तेवढे तेल वापरावे. (१ किंवा १-१/५ चमचा). मिरच्यांना परत एकदा उन दाखवावे. मिरच्या कडकडीत असल्या की मसाला चांगला बारीक कुटला जातो आणि चाळल्यानंतर मागे उरणारा भुस्साही खुपच कमी निघतो.

३. मिरच्या आणि इतर सर्व साहित्य एकत्र मिसळुन थंड झाल्यावर डंकन मध्ये कुटुन आणावे.

४. कोरड्या काचेच्या बरणीत मसाला भरावा. भरताना मध्ये मध्ये हिंगाचे खडे ठेवावेत म्हणजे मसाला खराब होत नाही.

Advertisements