२०१४ संपत आले….

आले आले म्हणताना २०१४ संपलेही. २०१५ उंबरठ्यावर येऊन उभे राहिले. सालाबादाप्रमाणे या वर्षी काय केले आणि काय केले नाही याची यादी करणे मनातल्या मनात सुरू. काय केले ची यादी लहान आणि काय केले नाही त्याची यादी हीSSSSSS मोठी.

असो, जे केले ते केले. जे करायचे राहुन गेले ते करण्याची सुबुद्धी निदान पुढच्या वर्षी तरी मला होवो. 🙂

पुढच्या वर्षी निदान हे तरी माझ्या हातुन व्हावे:

१. सोशल साईट्स आणि इतर साईट्सचे व्यसन शक्य तितके कमी करणे.

२. माझ्या या साईटवर शक्य तितके लिहिणे. अगदी रोजच लिहायला मिळाले तर उत्तमच. असे मागचे काहीबाही खरडलेले नंतर वाचायला खुप मजा येते. “आपण तेव्हापासुनच असा विचार करत होतो” पासुन ते थेट “आपण इतका मुर्खपणा करत होतो तेव्हा!!!!!” या रेंजमध्ये कुठेही भटकुन येता येते.

३. वुडहाऊसच्या दोन गोष्टी अर्धवट अनुवादीत करुन ठेवल्यात. त्या पुर्ण करायच्यात आणि नंतर जमेल तसे अनुवाद करायचेत.

४. सध्या मासिके आणि पुस्तकांसाठी एक व दिवाळी अंकांसाठी एक अशा दोन लायब्र-या लावल्या आहेत. पुस्तकांमध्ये कधी कधी खुप छान पुस्तके मिळतात वाचायला. दिवाळी अंक अजुन फारसे वाचले नाहीत पण एकाध अंकात फार चांगल्या कथा वाचायला मिळाल्या. हे असे वाचलेले नंतर विसरायला होते. इथे जर त्यांच्याबद्दल लिहुन ठेवले तर नंतर मला परत परत ते वाचायला मिळेल. अशा प्रकारे रसग्रहण करावे असा एक विचार आहे डोक्यात. बघु कितपत जमतेय ते वगैरे अजिबात बोलणार नाही. जमवायचेच.

५. फोटोग्राफीकडे पुर्ण दुर्लक्ष. हल्लीच नविन कॅमेरा घेतलाय. आता फोटो काढायचे.

Advertisements