हे ही दिवस जातील..

एकदा एका राजाने त्याच्या सल्लागारांना बोलावले आणि विचारले, “असा काही सल्ला किंवा मंत्र आहे जो कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही वेळी, कुठल्याही जागी उपयोगात येऊ शकेल? जेव्हा तुमच्यापैकी कोणीही मला सल्ला द्यायला नसेल तेव्हा मदत होईल असा काही मंत्र तुम्ही सांगु शकाल का?”

सगळे सल्लागार विचारात पडले. सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर? सगळीकडे अंमलात येऊ शकेल असा मंत्र? जो दु:खातही मार्गदर्शन करेल आणि सुखातही, पराजयात आणि विजयातही? असा काही मंत्र असु शकेल काय? खुप खल केल्यावर एका वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सल्लागाराने एक मंत्र सुचवला. सगळ्यांना तो लगेच पटला. त्यांनी तो लिहुन काढला आणि कागद राजाला दिला. अर्थात सोबत एक अट होतीच. राजाने मंत्र लगेच वाचायचा नाही तर जेव्हा गरज पडेल तेव्हाच तो मंत्र वाचायचा. गरजही अशी की जेव्हा सगळे मार्ग खुंटले असतील, प्राणांशी गाठ पडतेय की काय असे वाटेल तेव्हाच, फक्त तेव्हाच तो कागद उघडायचा आणि बघायचे काय आहे तो मंत्र. राजाने बोटातल्या हि-याच्या अंगठीत कागद ठेऊन दिला.

काही दिवसांनी राजाच्या राज्यावर हल्ला झाला. राजाच्या शत्रूंनी एकत्र येऊन अचानक जोरदार हल्ला केला होता. राजाने सर्व सैन्यानिशी जोरदार मुकाबला केला, पण त्याला यश आले नाही. रणांगणावरुन जीव वाचवुन त्याला पळून जावे लागले. घोडा राजाला घेऊन खुप खोल जंगलात गेला. मागुन शत्रूसेना पाठलाग करत होतीच. दुरवर घोड्यांच्या टापांचे आवाज दुमदुमत होते. अचानक राजाचा घोडा एका कड्याच्या टोकाशी पोचला. राजाने पाहिले, पुढे खोल दरी होती, मागे फिरावे तर टापांचे आवाज जवळ आल्यासारखे वाटत होते. काय करावे? राजाला काहीच सुचेना. अंत जवळ आलाय असे वाटु लागले.

तोच त्याच्या बोटातली अंगठी सुर्यप्रकाशात चमकली. त्याला एकदम सगळे आठवले. त्याने अंगठीतुन कागद काढला आणि वाचला.

‘हेही दिवस जातील….’ कागदावर लिहिले होते. राजाने परत परत वाचले आणि अचानक त्याला सगळा अर्थबोध झाला. ‘हो, हेही दिवस जातील! काही दिवसांपुर्वी माझे राज्य होते, मी सार्वभौम राजा होतो, आणि आज.. आज माझे राज्य, सगळे सुखोपभोग, सगळे नाहीसे झालेत. राज्यहीन असा मी, ह्या जंगलात शत्रूंपासुन स्वतःला लपवत फिरतोय. जर ते राज्य, सुख कायम टिकले नाही, तर मग हे दु:ख, हा अपमान तरी कसा कायम टिकेल? हेही दिवस निश्चितच जातील.’

राजाला या विचाराने खुप हुशारी वाटली. तो घोड्यावरुन खाली उतरला. आजुबाजूला पाहिले. अतिशय सुंदर असा निसर्ग चहुबाजूने खुणावत होता. आपल्या राज्यात अशी सुंदर जागा आहे हे त्याला माहितही नव्हते. कागदावरील मंत्र वाचुन त्याच्या चित्तवृत्ती ब-याच शांत झाल्या होत्या. निसर्गाने त्याचे मन अजुन शांत केले. थोड्या वेळाकरता तो समोर उभे असलेले संकटही विसरला. आजुबाजुचा निसर्ग तो पाहात राहिला.

थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की घोड्यांच्या टापांचा आवाज हळुहळू कमी होत होता. शत्रुसेना बहुतेक दुसरीकडे वळत होती.

राजा खुप शुर होताच. काही दिवसातच त्याने आपले सैन्य जमवले आणि शत्रुशी जोरदार लढाई करुन राज्य परत मिळवले.

विजयी राजा जेव्हा नगरात परतला तेव्हा त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. नागरिकांनी गुढ्या तोरणे उभारली. राजाच्या रथावर जागोजागी पुष्पवृष्टी होत होती. प्रजानन गात नाचत राजाचे गुणगाण करत होते. राजाचा उर अभिमानाने आणि गर्वाने भरुन आला. ‘मी सर्वशक्तिमान असा शूर आणि अजिंक्य राजा आहे. मला हरवणे आता कोणालाच शक्य नाही’ त्याचे मन आनंदले. ‘असे स्वागत केवळ माझ्यासारख्या महाप्रतापी राजाचेच होऊ शकते. दुस-या कोणाचाही हक्क असू शकत नाही यावर’.

अचानक सुर्यप्रकाशात अंगठीतील हिरा लखलखला आणि राजाला तो मंत्र आठवला. त्याने परत कागद उघडुन वाचला. ‘हेही दिवस जातील!’ राजा एकदम विरक्त झाला. ‘जर हेही एक दिवस संपणार असेल तर मग हे माझे कसे? हे माझे नाहीच. पराभवही माझा नव्हता आणि आताचा विजयही माझा नाहीय. मी आपोआप पुढे जातोय, प्रवाहाला गती देणारा मी नाही, त्याला स्वतःची गती आहे.’

कालातीत असा तो मंत्र क्षणभरही न विसरता राजाने त्यानंतर अनेक वर्षे न्यायाने राज्य केले आणि प्रजेला सुखात ठेवले.

Advertisements