बाय बाय २०११ वेलकम २०१२………

आज २३ डिसेंबर.. अजुन एक वर्ष संपतंय.. या वर्षी मी काय कमावले? काय गमावले? हातात काय शिल्लक राहिले?

नेहमीप्रमाणे या वर्षीही मी नविन धडे शिकले. बहुतेक माझे आयुष्य असेच नविन नविन धडे शिकण्यात जाणार आहे. आधी शिकलेल्या धड्यांमधुन वेचलेले शहाणपण (???) वापरण्याची संधी येत नाही, पण नविन धडे मात्र मिळतच राहताहेत.

तरीही वेळ अजुन गेलेली नाहीय. गेलेला वेळ माझा नव्हताच. आता पुढे असलेला वेळ मात्र सगळा बोनस आहे असे समजुन कंबर कसुन कामाला लागावे हे उत्तम.

या वर्षी शिकलेल्या धड्यांना पुढच्या वर्षी वापरायची संधी मिळो. २३ डिसेंबर २०१२ ला मी जेव्हा हे परत वाचेन तेव्हा आजची मी नसेन.

आजची मी नक्की कशी आहे? वजन वाढत वाढत ७४ किलोवर जाऊन पोचलेय. रोज ‘आहारातुन तेल हद्दपार करायचेय’ ही घोषणा करतेय, पण अजुन तेल काही हद्दपार झालेले नाहीय. रोज तेच तेच डाळ, भात, भाजी, चपाती खाऊन कंटाळलेय, आठवड्याचा मेन्यु बनवायचा हे गेले कित्येक आठवडे ठरवतेय. केसात मेंदी घालायला वेळ मिळत नाहीय, ब्लॉग्स वाचवाचुन रेसिपी गोळा करुन ठेवल्यात पण त्यांना प्रत्यक्षात उतरवायला वेळ नाही. आणि वेळ नसायला मी करतेय तरी काय एवढे मोठ्ठे काम? तर वेळ वाया घालवणे हेच एक मोठ्ठे काम करतेय…

पुढच्या वर्षी मी जेव्हा हे वाचेन तेव्हा आजची मी तेव्हा नसेन ह्या आशावादावर ह्या वर्षाचा निरोप घेते. बाय बाय २०११ वेलकम २०१२………