आरसा

आज ब-याच दिवसांनी आरश्यात डोकावले. भुरभूरीत पांढ-या केसांची, तेलकट कळाहिन चेह-याची एक पन्नाशीची वृद्धा माझ्याकडे पाहात होती. अरे देवा, माझे हे ध्यान कधी झाले? आणि हे होईपर्यंत मी स्वतःकडे पाहिलेच नाही की काय? काय करते काय मी दिवसभर?

खरेच काय करते मी दिवसभर? रात्री झोपताना दिवसभर काय काय केले त्याची यादी केली तर दखल घेण्याजोगे असे काहीही आढळत नाही. रोजचे उठले, ऑफिसात गेले, घरी आले, जेवले नी परत झोपले हे असते. तोंडाने सतत मला मेंदी घालायचीय डोक्यात, बरेच दिवस कुकूंबर क्रिम मसाज केला नाहीय, आज खुप तेलकट वाटतेय, मुलतानी माती लावायला पाहिजे चेह-यावर, टॉयलेट फ्लश खराब झालाय, प्लंबर बघायला हवा वगैरे वगैरे बडबड चालु असते. पण ह्यातल्या किती गोष्टी मी वेळच्यावेळी, ठरवलेल्या वेळी करते? केसात मेंदी घालुन दोन महिने झालेत, फ्लश खराब होऊन ६ महिने झालेत. पाण्याची टाकी वर्षभर गळतेय… एक का दोन.. अनंत कामे नी सगळी ‘आज नको, उद्या करुया….’ ह्या आश्वासनावर खोळंबलीत.

सकाळी उठताउठताच ७ वाजतात. उठल्यावर लगेच ‘श्श्यी, किती हा उशीर उठायला, आज नको वॉकिंग, उद्या जाऊया’ हीच सुरवात. मग चहा हवाच. ऋजूता दिवेकरने सांगितलेय, सकाळची सुरवात चहाने नको, फळ खा. पण सकाळी ७ वाजता फळे खाण्यासाठी आदल्या दिवशी ती बाजारातुन आणावी लागतात. फळे फ्रिजमध्ये आपोआप लागत नाहीत! मग ‘डायट उद्यापासुन, आज घेऊ चहाच. नाहीतरी पोट रिकामे ठेवायचे नाही असाची एक डायेट फंडा आहेच’ असे म्हणत चहा घ्यायचा नी करायची दिवसाची सुरवात. आणि मग सुरवातच अशी उत्तम झाल्यावर पुढचा दिवस कसा जाणार लोकहो? तो अर्थातच त्याच्या पायाने जातो. मी सगळ्या गोष्टी ‘आज नको, उद्या….’ करत राहते. आता हा उद्या कधी येणार?

माझ्या ह्या आळशीपणाने माझे अनंत नुकसान केलेले आहे. पण मी सुधारले मात्र नाहीय. मागच्या पानावरुन प्रकरण पुढे चालुच. कधीकधी ‘आपण आळशीपणा खुप करतो’ हा भुंगा मनाला कुरतडायला लागतो नी मग दोन दिवस काय मस्त जातात. ज्यांचे ग्रह उच्चीचे आहेत अशी सगळी कामे मला आठवतात नी मी ती धडाधड करुन टाकते. दोन दिवसातच उसने अवसान ओसरुन जाते नी परत मागच्या पानावरुन प्रकरण पुढे चालुच….

मी प्रत्येक कामात अशी चालढकल करत राहिले तर माझ्या मुलीचे काय? ती रोल मॉडेल म्हणुन माझ्याकडेच पाहणार ना? मी आजचे उद्या करायचे नी तिने मात्र सगळे वेळच्यावेळी करावे म्हणुन रागे भरायचे याला काय अर्थ?

तर मंडळी, आजचा माझा संकल्प हाच की आजपासुन आळसाला एक सणसणीत लाथ.

आजपासुन कल करेसो आज और आज करेसो अब हाच मंत्र….

मग बघते आरशात डोकावुन आणि कोणीतरी ब-यापैकी दिसणारी माझ्याकडे पाहात असेल अशी अपेक्षा ठेवते.

Advertisements