अपेक्षा

माझी एक्स-पर्सनल ट्रेनर तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेली. खुप छान नी सुंदर मुलगी. चांगले विचार बाळगणारी नी त्यांच्यावर ठाम राहणारी. तिचे लग्न जमायच्या नी त्याआधीच्या काळात ब-याच वेळा बोलायची ती लग्नाबद्दल. मला म्हणाली, ‘मी यांना आधीच सांगितलेय की माझ्या त्यांच्याकडुन काहीच अपेक्षा नाहीयेत.’ तिचे म्हणणे मी तेव्हा फारसे मनावर घेतले नाही. पण कुठेतरी मला हे काहीही अपेक्षा न ठेवणे खटकले. काहीच अपेक्षा नाहीत मग त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही का जाताय? आणि जरी म्हटले काहीच अपेक्षा नाहीत तरी या माणसाबरोबर आपले आयुष्य शांतपणे जावे ही अपेक्षा तर आहेच ना?

या अपेक्षाप्रकरणावर जसजसा विचार करत गेले तसे हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात यायला लागले. किती सहजतेने आपण म्हणतो की माझ्या तुझ्याकडुन काही अपेक्षा नाहीयेत. पण हे म्हणतानाही किती अपेक्षा असतात! अगदी एक दिवसाच्या बाळाच्याही अपेक्षा असतात की पोटात भुक लागली की तोंडात दुध मिळावे. नाही मिळाले की बघा कसा तो अर्ध्या रात्री बोंबाबोंब करुन सगळ्यांची झोप उडवतो ते. त्याला कुठे माहित असते हे अपेक्षाप्रकरण? तरीही अपेक्षा असतेच ना?

आणि का नसावी अपेक्षा? कळायला लागल्यापासुन आपण इतरांपासुन आणि आपल्यापासुनही अपेक्षा ठेवायला लागतो. इच्छा या शब्दाबरोबर अपेक्षा या शब्दाचे लग्न उगीच लागलेले नाही. आई मुलांवर निरपेक्ष प्रेम करते, अमुकतमुक समाजसेवक लोकांची निरपेक्ष सेवा करतात इ.इ. वाक्ये खोटी आहेत हो! मुलांवर निरपेक्ष प्रेम करताना आपल्या मुलांचे भले व्हावे ही अपेक्षा आईने मनी बाळगलेली असतेच की. आजा-यांची निरपेक्ष सेवा करणा-याच्या मनात हा आजारी लवकर बरा व्हावा ही अपेक्षा असतेच की. आता तुम्ही भलेही त्याला इच्छा म्हणा. पण इच्छा ही कुठे अपेक्षेपेक्षा वेगळी आहे? इच्छा नी अपेक्षा एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. मग निरपेक्ष काय आहे जगात? माझ्या मते काहीही नाही. सर्वसंगपरित्याग केलेल्या साधुंचीही ‘आता जन्ममरणाच्या फे-यातुन सुटका व्हावी नी मोक्ष मिळावा’ ही अपेक्षा असतेच. जन्माला येताच अपेक्षांचे डोंगर मनात उभे रहायला लागतात, हे डोंगर फक्त मृत्यूच कोसळवतो.

आपल्याला जन्मापासुन चिकटलेल्या ह्या अपेक्षांना आपण आपल्यावर कितपत अधिकार गाजवायला देणार यावर आपले या जन्मातले सुख-दु:ख अवलंबुन आहे. आपल्या अपेक्षांचा प्राधान्यक्रम (priorities) आपण आपल्या नकळतच ठरवलेला असतो. आता या अपेक्षा ज्यांच्याकडुन आहेत त्यांचा प्राधान्यक्रमही आपल्या प्राधान्यक्रमाशी जुळला तर आयुष्य सुखात जाणार, नाहीतर…… पण हे नाहीतरच जास्त करुन आपल्या वाट्याला येते कारण दोन माणसांचा प्राधान्यक्रम कधी जुळत नाही. मग एका कुटूंबात राहणा-या ५-६ जणांचा प्राधान्यक्रम कसा काय जुळणार? तरी बरे, एका बाजुने लोक आपल्या प्राधान्यक्रमाविषयी जागरुक व्हायला लागलेत त्याचवेळी कुटूंबातल्या लोकांची संख्या कमी व्हायला लागलीय. आजपासुन १०० वर्षांपुर्वी जेव्हा एका कुटूंबात कमीतकमी ५० माणसे असायची तेव्हा जर प्रत्येकजण आपल्या अपेक्षांचे बोजे दुस-यावर टाकुन त्याचा नी माझा प्राधान्यक्रम जुळावा अशी अपेक्षा करत बसला असता तर लोकांचे एकुणच जीवन किती दु:खी झाले असते. पण तेव्हा कुटूंबातल्या माणसांची संख्या जास्त असली तरी त्यात प्राधान्यक्रम बाळगणा-या लोकांची संख्या खुपच कमी असायची. अशा लोकांना तेव्हा कुटूंबप्रमुख म्हणुन ओळखले जात असे आणि इतर मंडळी कुटूंबप्रमुखाच्या प्राधान्यक्रमाशी आपला प्राधान्यक्रम गुपचुप जुळवुन घ्यायची. 🙂 आजच्यासारखे घरातल्या प्रत्येकाचा स्वतंत्र प्राधान्यक्रम ही चैन तेव्हा लोकांना माहितही नव्हती, त्यामुळे ती परवडायची चिंता कोणी केली नाही.

पण आजच्या जगात मात्र आपणाला स्वतःचा प्राधान्यक्रम जपायचा आहे, घरातल्यांनी नी जमले तर बाहेरच्यांनीही आपल्या प्राधान्यक्रमाला प्राधान्य द्यावे ही अपेक्षाही असते सोबत. प्रत्येकाची हीच इच्छा. आणि जितकी ही इच्छा तीव्र तितकी कोणाला माझे काहीच पडले नाहीय ही भावना प्रबळ होत जाते. मग सुखात आयुष्य घालवायचे, आनंदात स्ट्रेसफ्री जगायचे इ.इ. गोष्टींचे काय? आपल्या प्राधान्यक्रमाला इतरजण केराची टोपली दाखवताहेत हे पाहिल्यावर स्ट्रेसफ्री जगणे शक्य तरी आहे का? 🙂

आहे शक्य. जरा मी, माझे, माझा आनंद, मला हे वाटते, माझे हे मत आहे ह्या म ने सुरू होणा-या गोष्टी बाजुला ठेवल्या नी दुस-याचा प्राधान्यक्रम काय आहे ह्याच्याकडे लक्ष दिले तर त्याच्या प्राधान्यात आपल्या गोष्टी सहज मिसळून देता येतील.

लग्नाआधी तासनतास फोनवर बोलणा-या प्रियकराचा नवरा झाल्यावर त्याला दिवसातुन एकदोनच फोन करायला वेळ मि़ळायला लागला म्हणुन त्याचा फोन येताच बायको त्याच्यावर रागावू लागली तर एक-दोन फोन येतात तेही यायचे बंद होतील. 🙂 अशा वेळी त्याला मी रोज अमुक वाजता फोन करेन असे सांगुन आपणच फोन करणे श्रेयस्कर ठरेल. त्याने आधीसारखाच फोन करत राहिले पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर भयानक भडकण्याशिवाय आपल्या पदरात काहीही पडणार नाही. त्याचा प्राधान्यक्रम आता बदललाय हे गुपचुप मान्य करुन टाकावे 🙂

जोक्स अपार्ट, आपण जर दुस-याच्या अपेक्षा काय आहेत ते बघुन त्याप्रमाणे वागायला लागलो तर घरातले तापमान बरेचसे आटोक्यात राहिल आणि आपल्याला हवे ते सुख, शांती, आनंद स्वतःहुन आपल्या दारात येतील. यासाठी गरज आहे जरा पेशन्स ठेवायची. वर लिहिल्याप्रमाणे ‘म’ने सुरू होणा-या गोष्टी बाजुला ठेवायच्या नी दुस-याची अपेक्षा काय ते पाहायचे. समोरचा माणुस जे काय वागतोय ते असे का वागतोय ह्याचा विचार करायची सवय लावायची. त्याच्या बाजुने विचार करुन पाहायचा. हे सुरवातीला खुपच कठीण जाईल. अचानक आपण कोणीच नाही आहोत, आपल्याला कोणी महत्त्व देत नाहीये, सगळे आपापल्या जगात मश्गुल आहेत, मी जगतेय की मरतेय हेही पाहायला कोणाला वेळ नाहीय अशा भावना वारंवार दाटून येतील. पण परत तेच…. पेशन्स ठेवायचा. हळुहळू इतरांचा प्राधान्यक्रम आपल्याला थोडाफार आपल्यासाठीही अ‍ॅडजस्ट करता येतो. आणि करता नाही आला तर निदान दुस-याचा प्राधान्यक्रम काय आहे ते कळते, आपण त्यात कुठे बसतो तेही कळते आणि मग उगीचच फुकटच्या अपेक्षा ठेऊन आपण आपला नी त्याचा दोघांचाही दिवस खराब करत नाही. अगदीच सुखात राहिलो नाही तरी स्ट्रेसफ्री तरी नक्कीच राहतो.

मी हे करुन पाहिले आणि यश मिळवले. अगदी १००% नाही, पण माझा स्ट्रेस ब-याच प्रमाणात कमी केला. तुम्हीही पाहा करुन. 🙂

Advertisements