परत एकदा…….

 

२०१४ संपताना २०१५ साठी जे काय ठरवलेले ते हे होते …

 

पुढच्या वर्षी निदान हे तरी माझ्या हातुन व्हावे:

१. सोशल साईट्स आणि इतर साईट्सचे व्यसन शक्य तितके कमी करणे.

२. माझ्या या साईटवर शक्य तितके लिहिणे. अगदी रोजच लिहायला मिळाले तर उत्तमच. असे मागचे काहीबाही खरडलेले नंतर वाचायला खुप मजा येते. “आपण तेव्हापासुनच असा विचार करत होतो” पासुन ते थेट “आपण इतका मुर्खपणा करत होतो तेव्हा!!!!!” या रेंजमध्ये कुठेही भटकुन येता येते.

३. वुडहाऊसच्या दोन गोष्टी अर्धवट अनुवादीत करुन ठेवल्यात. त्या पुर्ण करायच्यात आणि नंतर जमेल तसे अनुवाद करायचेत.

४. सध्या मासिके आणि पुस्तकांसाठी एक व दिवाळी अंकांसाठी एक अशा दोन लायब्र-या लावल्या आहेत. पुस्तकांमध्ये कधी कधी खुप छान पुस्तके मिळतात वाचायला. दिवाळी अंक अजुन फारसे वाचले नाहीत पण एकाध अंकात फार चांगल्या कथा वाचायला मिळाल्या. हे असे वाचलेले नंतर विसरायला होते. इथे जर त्यांच्याबद्दल लिहुन ठेवले तर नंतर मला परत परत ते वाचायला मिळेल. अशा प्रकारे रसग्रहण करावे असा एक विचार आहे डोक्यात. बघु कितपत जमतेय ते वगैरे अजिबात बोलणार नाही. जमवायचेच.

५. फोटोग्राफीकडे पुर्ण दुर्लक्ष. हल्लीच नविन कॅमेरा घेतलाय. आता फोटो काढायचे.

 

आणि आज २०१५ चे चार महिने संपुन गेलेत तरीही यातले एकही काम झालेले नाही.   काय म्हणावे याला?  आळशीपणाची परिसीमा?

इंटरनेटवर मी किती वेळ वाया घालवावा याला काही धरबंधच उरलेला नाही.  नेट नव्हते त्या दिवसांमध्ये मी काय करत होते हा प्रश्न आता पडतो.  खरेच इंटरनेट असे व्यसन आहे जे आपल्याकडच्या सगऴ्यात महत्वाच्या गोष्टीचा नाश करते आणि ती महत्वाची गोष्ट आहे वेळ.  सिगरेट पिऊन फुफ्फुसे खराब झाली,  कॅन्सर झाला तर त्याच्यावर औषध शोधता येईल.  दारुमुळे जठर नाश पावले तर तिथे दुसरे जठर बसवता येईल (हा अगदीच टोकाचा युक्तीवाद झाला पण ठिक आहे,  हे शक्य तर आहे ना?  😉 )

पण वेळ ही वाहत्या पाण्यासारखी गोष्ट आहे.  नदीकिना-यावर तुम्ही बसलात की तुमच्या समोरुन वाहलेले पाणी परत दुस-यांदा तुम्हाला दिसत नाही.  वेळेचे तसेच आहे.  दर सेकंदाला वेळ रेतीसारखी हातातुन गळून जातेय.   तुम्ही काही करा किंवा करु नका.  वेळ जाणार आहेच.  मग काहीतरी केलेले बरेच बरे ना.

घरातली महत्वाची सगळी कामे झालीत.  आता फक्त रोजची साफसफाई, सैपाक आणि ऑफिस इतकेच काम शिल्लक आहे माझ्यासाठी.  आणि त्याच्यासाठी २४ तास म्हणजे खुपच वेळ आहे हातात.  या वेळेचा सदुपयोग करणे सुरू करा हो बाई आता.

सुरवात म्हणुन आधी ज्या दोन गोष्टी अनुवादीत करायला घेतल्या आहेत त्या पुर्ण करते.  येत्या सोमवारपर्यंत एकतरी गोष्ट पोस्ट करता यायलाच हवी हे स्वतःलाच बजावते आता.

यावर आपले मत नोंदवा