परत एकदा…….

 

२०१४ संपताना २०१५ साठी जे काय ठरवलेले ते हे होते …

 

पुढच्या वर्षी निदान हे तरी माझ्या हातुन व्हावे:

१. सोशल साईट्स आणि इतर साईट्सचे व्यसन शक्य तितके कमी करणे.

२. माझ्या या साईटवर शक्य तितके लिहिणे. अगदी रोजच लिहायला मिळाले तर उत्तमच. असे मागचे काहीबाही खरडलेले नंतर वाचायला खुप मजा येते. “आपण तेव्हापासुनच असा विचार करत होतो” पासुन ते थेट “आपण इतका मुर्खपणा करत होतो तेव्हा!!!!!” या रेंजमध्ये कुठेही भटकुन येता येते.

३. वुडहाऊसच्या दोन गोष्टी अर्धवट अनुवादीत करुन ठेवल्यात. त्या पुर्ण करायच्यात आणि नंतर जमेल तसे अनुवाद करायचेत.

४. सध्या मासिके आणि पुस्तकांसाठी एक व दिवाळी अंकांसाठी एक अशा दोन लायब्र-या लावल्या आहेत. पुस्तकांमध्ये कधी कधी खुप छान पुस्तके मिळतात वाचायला. दिवाळी अंक अजुन फारसे वाचले नाहीत पण एकाध अंकात फार चांगल्या कथा वाचायला मिळाल्या. हे असे वाचलेले नंतर विसरायला होते. इथे जर त्यांच्याबद्दल लिहुन ठेवले तर नंतर मला परत परत ते वाचायला मिळेल. अशा प्रकारे रसग्रहण करावे असा एक विचार आहे डोक्यात. बघु कितपत जमतेय ते वगैरे अजिबात बोलणार नाही. जमवायचेच.

५. फोटोग्राफीकडे पुर्ण दुर्लक्ष. हल्लीच नविन कॅमेरा घेतलाय. आता फोटो काढायचे.

 

आणि आज २०१५ चे चार महिने संपुन गेलेत तरीही यातले एकही काम झालेले नाही.   काय म्हणावे याला?  आळशीपणाची परिसीमा?

इंटरनेटवर मी किती वेळ वाया घालवावा याला काही धरबंधच उरलेला नाही.  नेट नव्हते त्या दिवसांमध्ये मी काय करत होते हा प्रश्न आता पडतो.  खरेच इंटरनेट असे व्यसन आहे जे आपल्याकडच्या सगऴ्यात महत्वाच्या गोष्टीचा नाश करते आणि ती महत्वाची गोष्ट आहे वेळ.  सिगरेट पिऊन फुफ्फुसे खराब झाली,  कॅन्सर झाला तर त्याच्यावर औषध शोधता येईल.  दारुमुळे जठर नाश पावले तर तिथे दुसरे जठर बसवता येईल (हा अगदीच टोकाचा युक्तीवाद झाला पण ठिक आहे,  हे शक्य तर आहे ना?  😉 )

पण वेळ ही वाहत्या पाण्यासारखी गोष्ट आहे.  नदीकिना-यावर तुम्ही बसलात की तुमच्या समोरुन वाहलेले पाणी परत दुस-यांदा तुम्हाला दिसत नाही.  वेळेचे तसेच आहे.  दर सेकंदाला वेळ रेतीसारखी हातातुन गळून जातेय.   तुम्ही काही करा किंवा करु नका.  वेळ जाणार आहेच.  मग काहीतरी केलेले बरेच बरे ना.

घरातली महत्वाची सगळी कामे झालीत.  आता फक्त रोजची साफसफाई, सैपाक आणि ऑफिस इतकेच काम शिल्लक आहे माझ्यासाठी.  आणि त्याच्यासाठी २४ तास म्हणजे खुपच वेळ आहे हातात.  या वेळेचा सदुपयोग करणे सुरू करा हो बाई आता.

सुरवात म्हणुन आधी ज्या दोन गोष्टी अनुवादीत करायला घेतल्या आहेत त्या पुर्ण करते.  येत्या सोमवारपर्यंत एकतरी गोष्ट पोस्ट करता यायलाच हवी हे स्वतःलाच बजावते आता.

Advertisements

चरैवेती…. चरैवेती…..

नुकतीच मायबोलीवर एक पोस्ट पाहिली. इलाही मेरा जी आए….

पोस्ट पाहुन मनाच्या तळात खोल दाबलेली इच्छा परत एकदा वर आली.. निरुद्देश भटकण्याची.  काहीतरी पाहण्यासाठी भटकण्यापेक्षा, भटकताना अचानक काहीतरी सामोरे आलेले पाहायची.  ही इच्छा कधीपासुन मनात आहे.  पण ती कधी साकार होणार आहे याची आजमितीला काहीच खात्री देता येत नाही.    जबाबदा-यांचे ओझे आहे असे म्हणता येणार नाही कारण जबाबदा-या स्वतःहुन आनंदाने घेतल्या आहेत.  त्यांचे ओझे अजिबात नाही.  पण त्याचवेळी या जबाबदा-या नसत्या तर कदाचित मनात येईल तेव्हा बाहेर पडता आले असते असेही वाटत राहते.

असेही वाटते आणि तसेही वाटते.  या जरतरच्या जंजाळात मन अडकुन राहते.  उद्या खरोखरीच मन मानेल तसे उंडारण्यासारखी परिस्थिती आली तर मी अशी उंडारेन का?  की ‘एकटी कशी जाणार’,  ‘वाटेत कोण कसे भेटेल,  वाईट अनुभव आले तर काय’ या प्रश्नजंजाळात भिरभिरत राहणार?

जे असेल ते,  सध्या तरी असे उंडारणे हे एक स्वप्न आहे.  तशी अजुन बरीच स्वप्ने आहेत.

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले….

या हजारो ख्वाईशांपैकी थोड्याफार तरी पु-या होऊदे.  आणि त्या पु-या होईतो  माझ्या हातापायात बळ टिकुदे.  आज त्या जगन्नियंत्याचरणी हीच प्रार्थना..!!!!!!   आमेन.

चरन्बै मधु विंदती, चरन्त्स्वधु मुदंबरम
सुर्यस्य पस्य श्रीमानम, यो न तंद्रयते चरन,
चरैवेती  चरैवेती…..

वरील श्लोकातले चरैवेती चरैवेती हे शब्द मी बराच काळ ऐकतेय.  कधीकधी खाताना मागे रेंगाळलेल्या कोणा मित्राला पाहुन गंमतीने मुद्दाम चरैवेती.. म्हणुन चिडवलेही आहे.  🙂  पण हा श्लोक मला देवनागरीमध्ये लिहिलेला कुठे मि़ळाला नाही.  नेटवर इंग्रजीतुन लिहिलेला मिळाला त्यावरुन मी देवनागरीत लिहिलाय.   लिहिताना नक्कीच चुका केल्या असणार.  जर कोणाला काही चुक सापडली तर सांगा, मी दुरुस्त करेन.

याचा साधारण अर्थ असा की –

फिरणा-या मधमाशीला मधाचा लाभ होतो, उडणा-या पक्ष्याला मधुर फळे खायला मिळतात. सतत मार्गक्रमण करत राहणा-या सुर्याला मानाचा नमस्कार केला जातो.

म्हणुन माणसानेही सतत चालत राहिले पाहिजे.  पुढे चला, पुढे चला…….

 

२०१४ संपत आले….

आले आले म्हणताना २०१४ संपलेही. २०१५ उंबरठ्यावर येऊन उभे राहिले. सालाबादाप्रमाणे या वर्षी काय केले आणि काय केले नाही याची यादी करणे मनातल्या मनात सुरू. काय केले ची यादी लहान आणि काय केले नाही त्याची यादी हीSSSSSS मोठी.

असो, जे केले ते केले. जे करायचे राहुन गेले ते करण्याची सुबुद्धी निदान पुढच्या वर्षी तरी मला होवो. 🙂

पुढच्या वर्षी निदान हे तरी माझ्या हातुन व्हावे:

१. सोशल साईट्स आणि इतर साईट्सचे व्यसन शक्य तितके कमी करणे.

२. माझ्या या साईटवर शक्य तितके लिहिणे. अगदी रोजच लिहायला मिळाले तर उत्तमच. असे मागचे काहीबाही खरडलेले नंतर वाचायला खुप मजा येते. “आपण तेव्हापासुनच असा विचार करत होतो” पासुन ते थेट “आपण इतका मुर्खपणा करत होतो तेव्हा!!!!!” या रेंजमध्ये कुठेही भटकुन येता येते.

३. वुडहाऊसच्या दोन गोष्टी अर्धवट अनुवादीत करुन ठेवल्यात. त्या पुर्ण करायच्यात आणि नंतर जमेल तसे अनुवाद करायचेत.

४. सध्या मासिके आणि पुस्तकांसाठी एक व दिवाळी अंकांसाठी एक अशा दोन लायब्र-या लावल्या आहेत. पुस्तकांमध्ये कधी कधी खुप छान पुस्तके मिळतात वाचायला. दिवाळी अंक अजुन फारसे वाचले नाहीत पण एकाध अंकात फार चांगल्या कथा वाचायला मिळाल्या. हे असे वाचलेले नंतर विसरायला होते. इथे जर त्यांच्याबद्दल लिहुन ठेवले तर नंतर मला परत परत ते वाचायला मिळेल. अशा प्रकारे रसग्रहण करावे असा एक विचार आहे डोक्यात. बघु कितपत जमतेय ते वगैरे अजिबात बोलणार नाही. जमवायचेच.

५. फोटोग्राफीकडे पुर्ण दुर्लक्ष. हल्लीच नविन कॅमेरा घेतलाय. आता फोटो काढायचे.

खुप दिवसांनी…..

आज ब-याच दिवसांनी इथे येतेय.  मस्त ट्रिप करुन आलेय लेहची.  त्याबद्दल लिहायचे आहे.  लवकरच सुरू करते.

Image

एक सुंदर रविवार……….

हा रविवार खुप छान गेला. अगदी दीर्घकाळ राहणा-या आठवणी देऊन गेला. आणि गंमत म्हणजे रविवारी उठल्यापासुन मी ‘आजचा दिवस अगदी वाईट्ट आहे’ हे उद्गार १०० वेळा तरी काढले असतील. पण इतका आशीर्वाद मिळूनही दिवस मात्र अगदी सुंदर गेला. 🙂

हल्ली ऑफिसात कामाचे डोंगर वाढल्यामुळे मायबोली वावर कमी झालाय. शुक्रवारी मायबोली उघडली तर वेबमास्तर रविवारी ठाण्यात अवतीर्ण होणार ही बातमी वाचली. मायबोलीने मला जो आनंद दिलाय त्याबद्द्लचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. निदान वेबमास्तरांना याची देही याची डोळा एकदा भेटून त्यांचे रितसर आभार मानावेत हा विचार करुन लगेच नावनोंदणी केली.

आता ठाण्यात जातेय आणि तिथला कार्यक्रम दुपारी १२ पर्यंत आटोपतोय म्हटल्यावर मनात विचार आला की गेल्या कित्येक वर्षात पेंडींग असलेली संदिपची भेटही लगे हाथ घ्यावी. सगळ्या जुन्या सोबत्यांप्रमाणे आम्हीही फोनवर भेटुयारे कधीतरी.. म्हणत राहातोय. तो ‘कधीतरी’ कधी उगवणार हे त्यालाही ठाऊक आहे की नाही देव जाणे. म्हटले चला, लगे हात संदिपलाही दर्शनाचा लाभ देउया. अशा त-हेने ठाण्याचे दोन गटग फिक्स झाले.

दुपारी जेवणानंतर आता कुठल्या कामाला आधी हात घालावा हा विचार करत होते तोच मैत्रिणीचा फोन आला. ही माझी अगदी सख्खी मैत्रिण संध्या. कॉलेज लाईफचा प्रत्येक दिवस एकत्र घालवलेला आणि गेली १५ वर्षे मात्र एकमेकांना भेटलेलो नाहीत 🙂 कधीतरी फोन केला की परत तीच टेप ‘भेटुया गं कधीतरी’. आमच्या शाळेच्या आमच्या आधीच्या आणि आमच्या नंतरच्या बॅचची हल्ली गेट टुगेदरं पार पडली पण आमच्या बॅचने अजुन कधी असले काही मनावर घेतलेले नाही. माझ्या नंतरच्या बॅचमधला एक मित्र माझ्या शेजारीच राहतो. त्याने किती वेळा सांगितले की, साधना, तु मला फक्त सांग, मी सगळ्यांना काँटक्ट करुन गेट टुगेदरची तयारी करतो. मी नुसती हसते, म्हणते, बाबारे गेली १५ वर्षे मी माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीला ‘भेटुया गं कधीतरी’ हाच राग आळवुन दाखवतेय. आधी तिला तर भेटते. बाकीचे नंतर बघु.

माझ्या ह्या प्रिय मैत्रिणिबरोबरची अजुन एक तेवढीच प्रिय मैत्रिण मंगलही त्या काळी माझ्याबरोबर होती. कॉलेजात आम्ही कधीच वेगवेगळ्या गेलो नाही. कायम एकत्र. कॉलेजमध्ये आम्हाला कोणी वेगळे असे ओळखलेच नाही. ‘त्या तिघी’ हीच आमची ओळख. तर अशा ह्या मैत्रिणीची आई दोन आठवड्यापुर्वी गेली. संध्यानेच फोन करुन मला ही बातमी दिली होती. मंगलला लवकरात लवकर भेटणे आवश्यक होते. आज संध्याने फोन भेट फिक्स करण्यासाठीच केला होता. रविवार जमेल का तुला? म्हटले अरे देवा.. आधीच दोन मिटींगा फिक्स केल्यात. आता ही तिसरी जमेल का? पण जर आता जमवले नसते तर परत कधी जमले असते कोण जाणे? आज-उद्या करत हे काम लांबणीवर पडले असले. तिला सरळ सांगितले रविवारी ३ वाजता मुलुंड स्टेशनला भेट. जमवुयाच आता एकदा आपल्या भेटीचे.

तर असा हा भरगच्च अपाईंटमेंटने भरलेला रविवार एकदाचा उजाडला………………………………….

रविवार म्हटले की मला उठवतच नाही सकाळचे. त्यामुळे नित्यासारखे सकाळी ७.३० ला वगैरे उठले. आजपासुन आमच्या बायजाक्का सुट्टीवर. त्यामुळे घरची मालकिणही मीच आणि मोलकरीणही मीच. माझ्या कामाचा एकंदर वेग लक्षात घेता सकाळी १० पर्यंत माझ्या हातुन फक्त नाश्ताच होऊ शकला असता. त्यामुळे इतर कामे बाजुला ठेऊन आधी त्यालाच हात घालायचा हे ठरवले. ऐशूला जीमला धाडुन दिले. मी टेकडीवर जाऊन एक फेरी मारुन आले आणि लगेच कामाला लागले. नाश्त्याला काहीतरी वेगळे करायचे तर पोह्या उपम्याशिवाय काय वेगळे करणार हा प्रश्न पडतो. एवढ्यात मायबोलीवर वाचलेले चहाच्या आधणाचे उप्पीट आठवले. म्हटले, चला करुया प्रयत्न. आणि काय सांगु राव! इतके मस्त झाले. तुम्हीही एकदा करुन पाहाच.

मग तयारी बियारी करुन बाहेर पडेपर्यंत १० वाजले. १०.१८ची ठाणे लोकल होती. ती गाठण्यासाठी धावपळ सुरू केली. पण आजचा दिवस खुपच वाईट होता. दाराला टाळे ठोकुन खाली उतरल्यावर लक्षात आले की ड्रेसवरची ओढणी घरातच… ऐशुला धाडले वर आणि ओढणी आणली. मग साधारण ५-७ मिनिटे चालत कॉलनीतल्या रिक्षास्टँडपाशी आलो तेव्हा आठवले की मोबाईल घरातच राहिला. संदीपचा नंबर माहित होता पण संध्याचे काय? एकतर ती अजुनही मोबाईल-अडाणी, त्यात तिच्या घरचा नंबरही मला पाठ नाही. ऐशुने परत घरी जायला नकार दिला. कसेबसे तिच्या हातापाया पडुन तिला परत घरी पाठवले. ती इतकी आरामात, डुलत डुलत घरी जाऊ लागली की शेवटी मी तिच्यामागुन गेले. मोबाईल मिळवुन परत कॉलनीबाहेर येईपर्यंत पावणेअकरा वाजले. पुढची लोकल ११ची होती. रिक्षावाल्याच्या डोक्यावर २५ रुपये आपटले आणि एकदाचे नेरुळ स्टेशनला पोचलो. गाडी जणु आमची वाट पाहातच उभी होती. पण आजचा दिवस वाईट्ट हे तिलाही माहित होते. ऐशु तिकीट काढायला धावत असताना मी ‘हुश्श्य, मिळतेय एकदाची गाडी!!! हे उद्गार काढतेय तोच गाडी माझ्या समोरुन हलली. ११ची गाडी चक्क अकराला ३ मिनिटे असताच स्टेशनातुन हलली. 😦 गाडीवाल्याला शिव्या घालत इंडिकेटर पाहिला तर पुढची गाडी ११.२७ ची लागलेली. अर्धा तास वाया घालवायचा?? एरवी मी वाया घालवलाही असता पण आजचा दिवस वाईट्ट होता ना.. त्यामुळे मला दुर्बुद्धी झाली आणि मी एलपीला जाऊन एस्टी पकडायचा निर्णय घेतला. तोपर्यत ऐशूमॅडमचे तिकिट काढुन झालेले. पण म्हटले जाऊदे, गटग ११.१५ ला सुरू होणार, आपण तिकिटाकडे बघत तिकडे उशीर करायला नको. लगेच झटपट निर्णय घेऊन स्टेशनबाहेर आले, येतानाच पाहिले, बेस्ट बस स्टॉपवर उभी होती. मी तिच्यामागे धावायला नको होते पण परत तेच… आजचा दिवस लैच वाईट..

धावतपळत बस पकडली. डरायवरसाहेबांनी हलत डुलत बस स्टेशनबाहेर काढली,२ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या डेपोत नेऊन उभी केली आणि स्वतः गाडीतुन खाली उतरले. कंडक्टरसाहेब गाडीतच त्यामुळे साहेब लवकरच परत येतील याची खात्री होती. ५ मिनिटांनी साहेब परतले, सोबत एक मेकॅनिक घेऊन. मग दोघांचा जो प्रेमळ संवाद झाला त्यावरुन मला बोध झाला की गाडीचे स्टिअरींग मध्येच अडकते आणि ते रिपेर करुन घेतल्याशिवाय गाडी काही इथुन हालत नाही. कँडक्टरसाहेबांनी माझ्याकडुन तिकिटांचे १६ रुपये उकळलेले. त्याला जागुन मी चुळबुळत गप्प बसले. डरायवर नी मेकॅनिक दोघेही ब-याच दिवसांनी भेटलेले बहुतेक. त्यामुळे आरामात एकमेकांशी प्रेमळ संवाद साधत त्यांचे काम चाललेले. मी हताश होऊन ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, ‘उगीच जास्त चुळबुळल्याने गाडी सुरू होणार नाही’, ‘ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर आपण आपले डोके अगदी शांत ठेवावे, भडकल्याने ट्रॅफिकजॅम कमी होत नाही’ इ.इ. स्ट्रेस कमी करण्याचे हमखास नुस्खे आठवत बसले. गटगला जायचा मुड क्षणाक्षणाला कमी कमी होत होता.

गाडीत ऑइल घालुन झाल्यावर डरायवर साहेबांनी मेकॅनिकसाहेबांना ‘तु सीट आणतोस का?’ वगैरे पृच्छा केली. त्यावर मेकॅनिकसाहेबांनी,’ तु गाडी मागे घे आणि स्टिअरिंग फिरवत बस, मी तोपर्यंत सीट आणतो’ असे सांगुन ते कुठेतरी गेले. डरायवर साहेब गाडी मागे घेऊन मग ती चालु करुन बहुतेक न्युट्रलला टाकुन मॉलमध्ये गेल्यावर प्ले एरियात लहान मुले गाडी चालवताना जसे स्टिअरींग गरागरा फिरवतात तसे फिरवत बसले. माझे गटग आता बसमध्येच होणार अशी स्पष्ट चिन्हे मला दिसायला लागली. याआधी कोणी अशी वाक्ये बोलताना वापरल्यावर ‘काय नाटकी बोलता राव’ असे वाक्य मी टाकायचे. आपबिती झाल्याशिवाय सत्याचा साक्षात्कार होत नाही हे त्याक्षणी मला पटले. घड्याळात ११.२० होत आलेले. आता लगेच हालचाल केली तर ११.२७ ची लोकलतरी भाग्यात लिहिली असेल असा विचार करुन बस सोडली आणि परत स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. नशीबाने ह्या लोकलने मात्र दगा दिला नाही. ११.२७ ची लोकल ११.२८ ला आली आणि मी लेकीसकट एकदाचे लोकलमध्ये चढले….

(क्रमशः)

नवा दिवस, नवा विचार…

 

 

ब्लॉग सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदा माझ्या ब्लॉगला सगळ्यात जास्त हिट्स मिळाले. I am feeling so happy!!!! दररोज काहीतरी लिहायचे ठरवलेय. मला वुडहाऊसच्या कथा भाषांतरीत करायला खुप आवडते. आता लवकरच त्याची एखादी सुंदर कथा घ्यायला पाहिजे भाषांतर करायला.