एक सुंदर रविवार……….

हा रविवार खुप छान गेला. अगदी दीर्घकाळ राहणा-या आठवणी देऊन गेला. आणि गंमत म्हणजे रविवारी उठल्यापासुन मी ‘आजचा दिवस अगदी वाईट्ट आहे’ हे उद्गार १०० वेळा तरी काढले असतील. पण इतका आशीर्वाद मिळूनही दिवस मात्र अगदी सुंदर गेला. :)

हल्ली ऑफिसात कामाचे डोंगर वाढल्यामुळे मायबोली वावर कमी झालाय. शुक्रवारी मायबोली उघडली तर वेबमास्तर रविवारी ठाण्यात अवतीर्ण होणार ही बातमी वाचली. मायबोलीने मला जो आनंद दिलाय त्याबद्द्लचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. निदान वेबमास्तरांना याची देही याची डोळा एकदा भेटून त्यांचे रितसर आभार मानावेत हा विचार करुन लगेच नावनोंदणी केली.

आता ठाण्यात जातेय आणि तिथला कार्यक्रम दुपारी १२ पर्यंत आटोपतोय म्हटल्यावर मनात विचार आला की गेल्या कित्येक वर्षात पेंडींग असलेली संदिपची भेटही लगे हाथ घ्यावी. सगळ्या जुन्या सोबत्यांप्रमाणे आम्हीही फोनवर भेटुयारे कधीतरी.. म्हणत राहातोय. तो ‘कधीतरी’ कधी उगवणार हे त्यालाही ठाऊक आहे की नाही देव जाणे. म्हटले चला, लगे हात संदिपलाही दर्शनाचा लाभ देउया. अशा त-हेने ठाण्याचे दोन गटग फिक्स झाले.

दुपारी जेवणानंतर आता कुठल्या कामाला आधी हात घालावा हा विचार करत होते तोच मैत्रिणीचा फोन आला. ही माझी अगदी सख्खी मैत्रिण संध्या. कॉलेज लाईफचा प्रत्येक दिवस एकत्र घालवलेला आणि गेली १५ वर्षे मात्र एकमेकांना भेटलेलो नाहीत :) कधीतरी फोन केला की परत तीच टेप ‘भेटुया गं कधीतरी’. आमच्या शाळेच्या आमच्या आधीच्या आणि आमच्या नंतरच्या बॅचची हल्ली गेट टुगेदरं पार पडली पण आमच्या बॅचने अजुन कधी असले काही मनावर घेतलेले नाही. माझ्या नंतरच्या बॅचमधला एक मित्र माझ्या शेजारीच राहतो. त्याने किती वेळा सांगितले की, साधना, तु मला फक्त सांग, मी सगळ्यांना काँटक्ट करुन गेट टुगेदरची तयारी करतो. मी नुसती हसते, म्हणते, बाबारे गेली १५ वर्षे मी माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीला ‘भेटुया गं कधीतरी’ हाच राग आळवुन दाखवतेय. आधी तिला तर भेटते. बाकीचे नंतर बघु.

माझ्या ह्या प्रिय मैत्रिणिबरोबरची अजुन एक तेवढीच प्रिय मैत्रिण मंगलही त्या काळी माझ्याबरोबर होती. कॉलेजात आम्ही कधीच वेगवेगळ्या गेलो नाही. कायम एकत्र. कॉलेजमध्ये आम्हाला कोणी वेगळे असे ओळखलेच नाही. ‘त्या तिघी’ हीच आमची ओळख. तर अशा ह्या मैत्रिणीची आई दोन आठवड्यापुर्वी गेली. संध्यानेच फोन करुन मला ही बातमी दिली होती. मंगलला लवकरात लवकर भेटणे आवश्यक होते. आज संध्याने फोन भेट फिक्स करण्यासाठीच केला होता. रविवार जमेल का तुला? म्हटले अरे देवा.. आधीच दोन मिटींगा फिक्स केल्यात. आता ही तिसरी जमेल का? पण जर आता जमवले नसते तर परत कधी जमले असते कोण जाणे? आज-उद्या करत हे काम लांबणीवर पडले असले. तिला सरळ सांगितले रविवारी ३ वाजता मुलुंड स्टेशनला भेट. जमवुयाच आता एकदा आपल्या भेटीचे.

तर असा हा भरगच्च अपाईंटमेंटने भरलेला रविवार एकदाचा उजाडला………………………………….

रविवार म्हटले की मला उठवतच नाही सकाळचे. त्यामुळे नित्यासारखे सकाळी ७.३० ला वगैरे उठले. आजपासुन आमच्या बायजाक्का सुट्टीवर. त्यामुळे घरची मालकिणही मीच आणि मोलकरीणही मीच. माझ्या कामाचा एकंदर वेग लक्षात घेता सकाळी १० पर्यंत माझ्या हातुन फक्त नाश्ताच होऊ शकला असता. त्यामुळे इतर कामे बाजुला ठेऊन आधी त्यालाच हात घालायचा हे ठरवले. ऐशूला जीमला धाडुन दिले. मी टेकडीवर जाऊन एक फेरी मारुन आले आणि लगेच कामाला लागले. नाश्त्याला काहीतरी वेगळे करायचे तर पोह्या उपम्याशिवाय काय वेगळे करणार हा प्रश्न पडतो. एवढ्यात मायबोलीवर वाचलेले चहाच्या आधणाचे उप्पीट आठवले. म्हटले, चला करुया प्रयत्न. आणि काय सांगु राव! इतके मस्त झाले. तुम्हीही एकदा करुन पाहाच.

मग तयारी बियारी करुन बाहेर पडेपर्यंत १० वाजले. १०.१८ची ठाणे लोकल होती. ती गाठण्यासाठी धावपळ सुरू केली. पण आजचा दिवस खुपच वाईट होता. दाराला टाळे ठोकुन खाली उतरल्यावर लक्षात आले की ड्रेसवरची ओढणी घरातच… ऐशुला धाडले वर आणि ओढणी आणली. मग साधारण ५-७ मिनिटे चालत कॉलनीतल्या रिक्षास्टँडपाशी आलो तेव्हा आठवले की मोबाईल घरातच राहिला. संदीपचा नंबर माहित होता पण संध्याचे काय? एकतर ती अजुनही मोबाईल-अडाणी, त्यात तिच्या घरचा नंबरही मला पाठ नाही. ऐशुने परत घरी जायला नकार दिला. कसेबसे तिच्या हातापाया पडुन तिला परत घरी पाठवले. ती इतकी आरामात, डुलत डुलत घरी जाऊ लागली की शेवटी मी तिच्यामागुन गेले. मोबाईल मिळवुन परत कॉलनीबाहेर येईपर्यंत पावणेअकरा वाजले. पुढची लोकल ११ची होती. रिक्षावाल्याच्या डोक्यावर २५ रुपये आपटले आणि एकदाचे नेरुळ स्टेशनला पोचलो. गाडी जणु आमची वाट पाहातच उभी होती. पण आजचा दिवस वाईट्ट हे तिलाही माहित होते. ऐशु तिकीट काढायला धावत असताना मी ‘हुश्श्य, मिळतेय एकदाची गाडी!!! हे उद्गार काढतेय तोच गाडी माझ्या समोरुन हलली. ११ची गाडी चक्क अकराला ३ मिनिटे असताच स्टेशनातुन हलली. :( गाडीवाल्याला शिव्या घालत इंडिकेटर पाहिला तर पुढची गाडी ११.२७ ची लागलेली. अर्धा तास वाया घालवायचा?? एरवी मी वाया घालवलाही असता पण आजचा दिवस वाईट्ट होता ना.. त्यामुळे मला दुर्बुद्धी झाली आणि मी एलपीला जाऊन एस्टी पकडायचा निर्णय घेतला. तोपर्यत ऐशूमॅडमचे तिकिट काढुन झालेले. पण म्हटले जाऊदे, गटग ११.१५ ला सुरू होणार, आपण तिकिटाकडे बघत तिकडे उशीर करायला नको. लगेच झटपट निर्णय घेऊन स्टेशनबाहेर आले, येतानाच पाहिले, बेस्ट बस स्टॉपवर उभी होती. मी तिच्यामागे धावायला नको होते पण परत तेच… आजचा दिवस लैच वाईट..

धावतपळत बस पकडली. डरायवरसाहेबांनी हलत डुलत बस स्टेशनबाहेर काढली,२ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या डेपोत नेऊन उभी केली आणि स्वतः गाडीतुन खाली उतरले. कंडक्टरसाहेब गाडीतच त्यामुळे साहेब लवकरच परत येतील याची खात्री होती. ५ मिनिटांनी साहेब परतले, सोबत एक मेकॅनिक घेऊन. मग दोघांचा जो प्रेमळ संवाद झाला त्यावरुन मला बोध झाला की गाडीचे स्टिअरींग मध्येच अडकते आणि ते रिपेर करुन घेतल्याशिवाय गाडी काही इथुन हालत नाही. कँडक्टरसाहेबांनी माझ्याकडुन तिकिटांचे १६ रुपये उकळलेले. त्याला जागुन मी चुळबुळत गप्प बसले. डरायवर नी मेकॅनिक दोघेही ब-याच दिवसांनी भेटलेले बहुतेक. त्यामुळे आरामात एकमेकांशी प्रेमळ संवाद साधत त्यांचे काम चाललेले. मी हताश होऊन ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, ‘उगीच जास्त चुळबुळल्याने गाडी सुरू होणार नाही’, ‘ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर आपण आपले डोके अगदी शांत ठेवावे, भडकल्याने ट्रॅफिकजॅम कमी होत नाही’ इ.इ. स्ट्रेस कमी करण्याचे हमखास नुस्खे आठवत बसले. गटगला जायचा मुड क्षणाक्षणाला कमी कमी होत होता.

गाडीत ऑइल घालुन झाल्यावर डरायवर साहेबांनी मेकॅनिकसाहेबांना ‘तु सीट आणतोस का?’ वगैरे पृच्छा केली. त्यावर मेकॅनिकसाहेबांनी,’ तु गाडी मागे घे आणि स्टिअरिंग फिरवत बस, मी तोपर्यंत सीट आणतो’ असे सांगुन ते कुठेतरी गेले. डरायवर साहेब गाडी मागे घेऊन मग ती चालु करुन बहुतेक न्युट्रलला टाकुन मॉलमध्ये गेल्यावर प्ले एरियात लहान मुले गाडी चालवताना जसे स्टिअरींग गरागरा फिरवतात तसे फिरवत बसले. माझे गटग आता बसमध्येच होणार अशी स्पष्ट चिन्हे मला दिसायला लागली. याआधी कोणी अशी वाक्ये बोलताना वापरल्यावर ‘काय नाटकी बोलता राव’ असे वाक्य मी टाकायचे. आपबिती झाल्याशिवाय सत्याचा साक्षात्कार होत नाही हे त्याक्षणी मला पटले. घड्याळात ११.२० होत आलेले. आता लगेच हालचाल केली तर ११.२७ ची लोकलतरी भाग्यात लिहिली असेल असा विचार करुन बस सोडली आणि परत स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. नशीबाने ह्या लोकलने मात्र दगा दिला नाही. ११.२७ ची लोकल ११.२८ ला आली आणि मी लेकीसकट एकदाचे लोकलमध्ये चढले….

(क्रमशः)

Categories: आठवणी.. आठवणी.... काय करावे यांचे? | यावर आपले मत नोंदवा

नवा दिवस, नवा विचार…

ब्लॉग सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदा माझ्या ब्लॉगला सगळ्यात जास्त हिट्स मिळाले. I am feeling so happy!!!! दररोज काहीतरी लिहायचे ठरवलेय. मला वुडहाऊसच्या कथा भाषांतरीत करायला खुप आवडते. आता लवकरच त्याची एखादी सुंदर कथा घ्यायला पाहिजे भाषांतर करायला.

Categories: असेच काही बाही | यावर आपले मत नोंदवा

टाईमपास………..

ऑफिसातुन दोन आठवडे सुट्टी घेतली आणि घरी बसुन टाईमपास केला. भरपुर काही करायचे मनात असते पण प्रत्यक्ष मात्र काहीच होत नाही. आळस भरुन राहिलाय. चार दिवस आंबोलीला गेले. तिथेही नुसते बसुन दिवस काढले. नाही म्हणायला तिथे शेत विकत घेण्याच्या दृष्टीकोनातुन काहीतरी हालचाल झाली इतकेच. बाकी ‘राग दरबारी’ वाचत बसले. हे पुस्तक फारच विचित्र आहे. मध्येच वाटते की यातला शब्दन शब्द अगदी आजही खरा आहे. ७० च्या दशकात लिहिले गेलेले हे पुस्तक आजही आजच्या काळाशी तितकेच इमान राखुन आहे. तर कधी वाटते, की यात खुपच निगेटिवीटी भरलीय. कुठे काहीही पॉझिटिव लिहिलेलेच नाही. आणि तरीही ते आजही तितकेच खरे वाटतेय. :(

गेल्या वर्षी केलेला मसाला संपुन ६ महिने झाले तरी अजुन नविन मसाला करायला मुहुर्त काही सापडत नव्हता. तो एकदाचा शुक्रवारी सापडला. संध्याकाळि उठले आणि एपिएमसीत गेले. गेलेले फक्त मिरच्या आणण्यासाठी पण सोबत इतरही भरपुर सामान घेऊन आले. ऐशुला द अवेंजर्स बघायचा होता. त्याची तिकिटेही घेऊन आले. शनिवारी पुर्ण सकाळ चित्रपटाच्या भानगडीत गेली. कलत्या दुपारी मिरच्या वाळवत बसले. तिन किलो मिरच्यांचे देठ काढेपर्यंट सात वाजले. नंतर स्थानिक जिममध्ये जाऊन फॅटलॉससाठीच्या प्लॅन्ससाठीची चौकशी… तळवलकर्स खुपच महागडे आहे. शेजारच्या दुस-या जीमने त्याच सोयी जवळजवळ २/३ पैशात दिल्या. लेकीचा हट्ट जीमच पाहिजे म्ह्णुन.. नाहीतर रोज सकाळी उठुन धावायला गेली असती तरी वजन कमी झाले असते. पण जाऊदे, ह्या निमित्ताने रोज सकाळि लवकर तरी उठेल.

आजचा अख्खा दिवस परत कामातच गेला. गावाहुन हिरव्या मिरच्या आणलेल्या. त्यांच्यात मसाला भरुन, सुकवुन केलेल्या सांडग्या मिरच्या माझ्या खास आवडीच्या. संध्याकाळ्भर लागुन हा उद्योग केला. आता दोन्-चार दिवस उन्हात वाळवाव्या लागतील. मिरच्यांना पण उन दाखवले.

उद्या परत ऑफिस आहे, परवा सुट्टी. उद्या जर सुट्टी घेता आली तर संध्याकाळपर्यंत मसाला कुटूनही होईल. उद्या करते फोन नी पाहते. :)

Just wondering how to pep up life… I guess i will start my studies again… that will surely pep me up..

Categories: असेच काही बाही | 2 प्रतिक्रिया

बाय बाय २०११ वेलकम २०१२………

आज २३ डिसेंबर.. अजुन एक वर्ष संपतंय.. या वर्षी मी काय कमावले? काय गमावले? हातात काय शिल्लक राहिले?

 नेहमीप्रमाणे या वर्षीही मी नविन धडे शिकले. बहुतेक माझे आयुष्य असेच नविन नविन धडे शिकण्यात जाणार आहे. आधी शिकलेल्या धड्यांमधुन वेचलेले शहाणपण (???) वापरण्याची संधी येत नाही, पण नविन धडे मात्र मिळतच राहताहेत.

तरीही वेळ अजुन गेलेली नाहीय. गेलेला वेळ माझा नव्हताच. आता पुढे असलेला वेळ मात्र सगळा बोनस आहे असे समजुन कंबर कसुन कामाला लागावे हे उत्तम.

या वर्षी शिकलेल्या धड्यांना पुढच्या वर्षी वापरायची संधी मिळो. २३ डिसेंबर २०१२ ला मी जेव्हा हे परत वाचेन तेव्हा आजची मी नसेन.

आजची मी नक्की कशी आहे? वजन वाढत वाढत ७४ किलोवर जाऊन पोचलेय. रोज ‘आहारातुन तेल हद्दपार करायचेय’ ही घोषणा करतेय, पण अजुन तेल काही हद्दपार झालेले नाहीय. रोज तेच तेच डाळ, भात, भाजी, चपाती खाऊन कंटाळलेय, आठवड्याचा मेन्यु बनवायचा हे गेले कित्येक आठवडे ठरवतेय. केसात मेंदी घालायला वेळ मिळत नाहीय, ब्लॉग्स वाचवाचुन रेसिपी गोळा करुन ठेवल्यात पण त्यांना प्रत्यक्षात उतरवायला वेळ नाही. आणि वेळ नसायला मी करतेय तरी काय एवढे मोठ्ठे काम? तर वेळ वाया घालवणे हेच एक मोठ्ठे काम करतेय…

पुढच्या वर्षी मी जेव्हा हे वाचेन तेव्हा आजची मी तेव्हा नसेन ह्या आशावादावर ह्या वर्षाचा निरोप घेते. बाय बाय २०११ वेलकम २०१२………

Categories: असेच काही बाही | १ प्रतिक्रिया

खानदेशी मांडे

मांडे हा शब्द मी साधारण दुसरी-तिसरीत असताना मराठीच्या पुस्तकात पहिल्यांदा वाचला. मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले.. वगैरे वाचुन मांडे म्हणजे काहीतरी खायचा पदार्थ आहे हे लक्षात आले. पण हा पदार्थ दिसतो कसा, खातात कशाबरोबर इत्यादी प्रश्न मनात उपस्थित झाले. म्हणजे तसे मला तेव्हा जिलेबी, पुरणपोळी इत्यादी पदार्थही कसे दिसतात ते माहित नव्हते. पण ते शब्द कानावरुनही गेले नव्हते, त्यामुळे अर्थात दिसतात कसे हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता.

मग काही दिवस मी आईच्या मागे भुंगा लावुन दिला, ‘मांडे म्हणजे काय ते मला सांग.’ आता आंबोलीसारख्या खेड्यात राहणा-या माझ्या आईनेही मांडे कधी ऐकले नव्हते. ती मला काय सांगणार कप्पाळ??!! तिला फक्त तांदळापासुन बनवण्यात येणारे पोळ्या, खापरोळ्या, शिरवाळ्या इत्यादी पदार्थ माहित होते. शेवटी तिने मांडे हे आंबोळीसारखेच असतात असे मला सांगुन स्वतःची सुटका करुन घेतली. सगळे जग तांदुळमयच आहे यावर माझा तेव्हा खुपच विश्वास होता, त्यामुळे मीही मांडे हा आंबोळीसारखा दिसणारा, तांदळापासुन बनवलेला काहीतरी गोड गोड पदार्थ आहे असा माझा समज करुन घेतला. कालांतराने मी हे सगळे विसरुनही गेले.

काही वर्षांपुर्वी लोकप्रभाचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील पदार्थांवर एक विशेषांक निघाला होता. त्यात मांड्यांचा उल्लेख वाचला. परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. पण एक पदार्थ म्हणुन मांड्यांबद्दल काहीच माहिती त्या अंकात दिली नव्हती. लेखकाने ‘मांडे खुप मोठे होते, एकाचे चार तुकडे करुन आम्ही खाल्ले’ म्हणुन लिहिले होते. परत माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू….. इतका मोठा पदार्थ की चारजणांना खावा लागला? नक्कीच लेखकाची खाण्याची क्षमता कमी असणार…….

तेव्हा इंटरनेट वगैरे फारसे नसल्याने गुगलुन वगैरे पाहताही आले नाही.. (आता सगळे कसे सोप्पे झालेय ना?? डोक्यात प्रश्न आला की चला लगेच गुगलवर…… )

मांड्यांना मी परत एकदा विसरले. तीनचार वर्षांपुर्वी ऑफिसात सटाणा-नाशिकच्या एका मित्राने पुरणपोळीसदृष्य एक पदार्थ आणला. एकदम पातळ कवर आणि त्यात अतिशय कोरडे असे गोड सारण. आकार कसा असणार याचा पत्ता लागेना कारण त्याने तुकडे करुन आणलेले. हे काय आहे असे विचारल्यावर तो म्हणाला, आमच्याकडे ह्याला मांडे म्हणतात. तुम्ही पुरणपोळी म्हणा आणि खा. मी एकदम उडीच मारली. म्हटले, गेले कित्येक वर्षे मी जे मांडे मांडे म्हणुन ऐकतेय ते आज असे अचानक पुढ्यात आले….

मग त्या मित्राला विचारले कसे करतात वगैरे वगैरे. तो म्हणाला, खुप कठीण आहेत करायला. माझी आई हातांवर अश्शी अश्शी फिरवुन करते आणि मग खापरावर भाजते. मी परत बुचकळ्यात. आमच्याकडे मातीचे मडके फुटले की त्याच्या तुकड्याला खापर म्हणतात. आता ह्या लोकांनी खापराच्या तुकड्यांवर कसे काय भाजले असणार हे मांडे?? छ्या.. खुप गर्दी झाली डोक्यात विचारांची. त्या मित्राला माझी दया आली. तो म्हणाला, कधीतरी माझ्या गावी ये आणि बघ कसे करतात ते मांडे.

तर मित्रांनो, माझ्या त्या दिव्य मित्राच्या घरी जाऊन मांडे बघण्याचे भाग्य मला ह्या दस-याला लाभले. त्याच्या घरी चक्रपुजा होती. त्या निमित्ताने त्याने बोलावले. म्हणाला, मांडे हा चक्रपुजेतला एक महत्वाचा घटक आहे, तर तुला त्या निमित्ताने पहायला मिळेल मांडे कसे करतात ते. मी मग अगदी सुरवातीपासुन पाहिले मांडे कसे करतात ते आणि तुमच्यापैकी कोणी माझ्यासारखेच अज्ञ असतील मांड्यांच्या बाबतीत तर त्यांचेही अज्ञान दुर व्हावे म्हणुन इथे लिहिण्याचा उद्योग करतेय…

बाकी हे मला पाककृतीतही टाकता आले असते, पण जी पाकृ मला ह्या जन्मात करायला जमणार नाहीय ती उगाच इथे टाकायला जीव धजावला नाही. इथे टाकण्यासाठीची पाकृ आधी आपल्याला तरी करता यायला पाहिजे ना…..

तर मंडळी, आता हे मांडे बनतात कसे ते पाहुया…

मांड्यांचे सारण आपण पुरणपोळीचे करतो तसेच करतात. चणाडाळ धुवुन चुलीवर शिजत ठेवतात, शिजली की मोठ्या चाळणीवर ओतुन पाणी पुर्णपणे काढतात आणि मग परत चुलीवर चढवुन तिच्यात गुळ घालुन गुळ शिजेपर्यंत आणि सारण थोडे सुकेपर्यंत ढवळत राहतात. गरम असतानाच पाट्यावर वाटायचे. मिक्सरवर वाटले तरी चालते. एकदम बारीक वाटले गेले म्हणजे झाले.

मांड्यांचे कवर पाहुन ते मैद्याचे केलेय असे वाटते पण ते तसे नाहीय.

अगदी उत्तम प्रतिचा लोकवण वगैरे गहु घ्यायचा, तो स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायचा आणि जात्यावर अगदी बारीक पिठ दळायचे. जर गिरणीवर दळुन आणले तरी चालते. नंतर चाळणीने चाळण्याऐवजी वस्त्रगाळ करुन घ्यायचे. पिठ वस्त्रगाळ करुन घेतले नाही तर मांडा बनवताना कडेला जाड राहतो, भाजताना कडा निट भाजल्या जात नाहीत आणि मग तेवढी गोल कड काढुन टाकावी लागते.

मग हवे तितके पिठ घेऊन थोडे तेल घालून, मीठ घालुन पाण्याने भिजवायचे. मीठ अगदी नेमके, योग्य प्रमाणात घालायला हवे, कारण कमी पडले तर मांडा करताना मोडतो. साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसे भिजवायचे नी मग त्याला तासभर तरी तेल लावुन उलटेसुलटे फिरवत तिंबत बसायचे.

तासाभराने अगदी मैद्याच्या पिठासारखा पोत आणि लवचिकपणा येतो या पिठाच्या गोळ्याला. सारणापेक्षा पिठ निट जमायला हवे, नाहीतर सगळेच ओम्फस व्हायचे. मांडा करताना मोडत असल्यास मीठ बरोबर पडले का ते चेक करतात आणि कमी असल्यास घालुन परत मळतात. मग मांडा न मोडता व्यवस्थित होतो.

पिठ भिजवणा-या आजीबाईंनी दोन चमचे पुरण टाकले पिठातआणि परत एकदा तिंबुन मग झाकुन ठेवले गोळ्याला. असे केल्याने छान लाटले जाते म्हणे.

आता पिठ आणि सारण दोन्ही तयार आहेत. तिन विटा मांडुन वेगळी चुल लावली जाते. अर्थात आज भरपुर मांडे करायचे असल्याने ही सोय केलीय. अन्यथा रोजच्याच चुलीवर खापर ठेऊन मांडे भाजायचे. हे खापर म्हणजे खास मांडे भाजण्यासाठी बनवलेलेल मातीचे भांडे! साधारण १५०-२०० रु. पर्यंत किंमत असलेले हे मडके दिसायला दोन बशा एकमेकींवर उपड्या ठेवल्या तर जशा दिसतील तसे दिसते. त्याला खालच्या बाजुने तोंड असते. तिच्यातुन धग वरपर्यंत पोचुन मांडे भाजले जातात. शहरवासिय मांडेप्रेमींसाठी गॅसवर वापरता येतील अशी लहान आकाराची खापरेही आता बाजारात मिळु लागलीत अशी माहिती आजीबाईंनी दिली.

मांड्यांचा पसारा अगदी खाली दिसतोय तसा मांडायचा आणि करायचे सुरू मांडे करायला.

र आता मांडा बनवतात कसा ते पाहु. प्रथम आपली मोठी पोळी असते त्या आकाराच्या दोन पोळ्या करुन घेतात. मग साधारण नारळाच्या आकाराचा सारणाचा गोळा घेऊन त्याला ह्या दोन पोळ्यांच्या मधे ठेवतात. बाजु हळु बंद करुन घेतात आणि मग बाजुबाजुने हळुवारपणे लाटायचं.

http://www.youtube.com/watch?v=BuTJlQbDfjo

दोन पोळ्या झाल्या की नारळाएवढे सारण घ्यायचे आणि भरायचे दोन पोळ्यांमध्ये आणि मग मांडा लाटायला घ्यायचा.

लाटताना पोळपाट न वापरता मोठे ताट उपडे घालुन त्यावर लाटतात म्हणजे मोठा पृष्ठभाग मिळतो लाटायला. लाटत लाटत ताट भरले की पोळी हळुच उचलुन हाताने फिरवायची. फिरवत फिरवत अलगद दोन्ही हात आडवे घेऊन कोपरांचा आधार द्यायचा आणि कोपराकोपरांनी मांड्याला फिरवायचे. हे काम जलद करावे लागते त्याचबरोबर जपुनही करावे लागते. जलद अशासाठी की सारण सरकून एकाच बाजुला यायला नको आणि हे करताना मांडा मोडु नये म्हणुन जपायचे.

असा तयार झालेला मांडा आता खापरावर टाकायचा. एवढा मोठा मांडा गोल आकाराच्या खापरावर अजिबात चुणी वगैरे न पाडता टाकणे ही सुद्धा एक मोठी कला आहे असे वाटले पाहुन.

मांडा खापरावरुन घसरुन पडु नये म्हणुन कधीकधी काहीतरी जड ठेवतात वर.

मग एका बाजुने भाजला की अलगदपणे आणि अतिशय वेगात तो उलटवायचा.

दोन्ही बाजु भाजल्या की खाली काढायचा आणि जरा थंड झाला की घडी घालायची. ही घडी आयताकृती घालतात. जर कोणी नुसती घडी बघितली की त्याला पत्ताच लागणार नाही हा पदार्थ गोल आहे ह्याचा.

आपण पुरणपोळीला वरुन तुप लावतो तसे मांड्यांना तुप वगैरे काही लावत नाहीत. चणाडाळ शिजवल्यावर जे पाणी काढतात त्याचीच आपण कटाची आमटी करतो तशी आमटी करतात. त्यात मांडा बुडवुन खातात. तसेच दुध थोडे आटवुन त्यात साखर घालुन बासुंदीसारखे करतात. चक्रपुजेला हे दोन प्रकार करतात आणि मांडा त्यात बुडवुन खातात.

आंब्याच्या मोसमात आमरस करायचा आणि सोबत मांडे! एरवी एक माणुस फक्त अर्धाच मांडा खाऊ शकतो एकावेळी. पण आमरस केल्यास मात्र १ ते दिड मांडा एक माणुस सहजपणे खाउन जातो अशी आमरसाची किमया आजोबांनी ऐकवली!!!!

चक्रपुजा ही घरात धनधान्य भरपुर यावे, समृद्धी यावी यासाठी केली जाते असे मला पुजेचे स्वरुप पाहुन वाटले. सांज्याच्या करंज्या करतात, त्यांना सांजोरी म्हणतात. गुळाचे पाणी घालुन गव्हाच्या गोड पु-या करतात, त्यांना सोळी म्हणतात.

पुजा मांड्ताना एका बाजुला वीटा रचुन होमाची तयारी करतात. होमापुढे तांदुळ पसरतात आणि मुठीत तांदुळ घेऊन एकात एक अशी पाच्-सात वर्तुळे काढतात. त्या वर्तुळावर घरच्या बागेतल्या आंबा, सिताफळ, लिंबु वगैरे झाडांच्या छोट्या फांद्या अंथरतात. त्यावर गोलाकारात मांडे रचतात. मधे एक आणि बाजुला गोल दहा मांडे असे अकरा मांडे रचतात. मांड्यांवर सोळी, सांजोरी लावतात. तळलेल्या कुरडया रचतात. त्यावर दहा दिवे आणि मध्ये एक मोठा दिवा (ह्याला मेंढ्या म्हणतात) असे पिठाचे दिवे ठेवतात. हे दिवेही आधी बनवुन उकडुन तयार ठेवतात.

होम पेटवल्यावर होमाच्या ज्योतीने मधला दिवा आणि बाजुचे दहा दिवे पेटवतात. मग सगळ्यांनी नमस्कार करायचा. सगळे झाले की पंगत बसते आणि मग मांड्याचा यथायोग्य समाचार घेतला जातो.

तर असे हे मांडेपुराण…. आवडले तर पुढच्या वर्षी माझ्याबरोबर चला चक्रपुजेला….

विडिओज पण घेतलेले आहेत. खाली लिंक्स दिल्यात त्या कृपया पाहा. आवाज मात्र शुन्यावर ठेवा, अर्थात ज्यांना अहिराणी बडबड ऐकायची असेल त्यांनी ऐकावी….

जरासा मोठा झाला की अलगद हातावर उचलुन घ्यायचा आणि मनगट व कोपराचा आधार देत देत मोठा करायचा. अगदी पातळ झाला की मग खापरावर टाकायचा. कधीकधी मांडा सुळ्ळकन घसरुनही पडतो खापरावरुन. तसे होऊ नये म्हणुन काहीतरी जड ठेवतात वर. फोटोत मक्याचे दाणे काढल्यावर उरलेले कांड ठेवले आहे. एरवी त्याचा उपयोग सैपाकघरात जळण म्हणुन होतो.

एक बाजु पुरती भाजली गेली की मांडा उलटवायचा. मांड्याला खालच्या बाजुला कधीकधी आंच मिळत नाही त्यामुळे जळते लाकुड घेऊन त्याचा शेक देतात. दोन्ही बाजु शेकल्या की उतरवायचा आणि घडी घालायची.

मला मांडे करुन पाहण्याचा खुप आग्रह झाला. पण इतक्या बायकांच्या फौजेसमोर आपले पितळ उघडे पडु नये म्हणुन मी नम्रपणे नकार दिला….   :)

(मायबोली.कॉम वर पुर्वप्रकाशित. http://www.maayboli.com/node/12329)

Categories: थोडे वेगळे | Tags: | यावर आपले मत नोंदवा

परोपकारी – शेवट

कोप-यात पडुन त्याच्याकडे पाहात असताना माणसाला मदत करण्याची एक भन्नाट कल्पना माझ्या डोक्यात आली. फ्रेड वरच्या मजल्यावर झोपला होता आणि शप्पथ सांगतो, फ्रेडसारखा कोणाशीही चटकन मैत्री करणारा दुसरा कोणी नसेल. फ्रेडची सगळ्यांशी लगेच मैत्री होत असे. मला तर वाटले की मी जर माणसाला आणि फ्रेडला एकत्र आणले तर दोघांचेही एकमेकांशी एकदम पटेल आणि माणसाला आपण उगीचच माणुसघाणेपणा करत होतो हे पटेल. फ्रेडमुळे त्याच्यात नसलेला आत्मविश्वास जागा होईल. तसेही मी त्याला बिलबरोबर मोकळेपणे बोलताना पाहिले होते.

अर्थात माझा हा चोंबडेपणा माणसाला आवडणार नाही म्हणा, पण माझा विशुद्ध हेतू लक्षात आल्यावर तो माझे आभारच मानेल.

आता प्रश्न हा होता की माणसाला न घाबरवता फ्रेडला खाली कसे आणायचे? मी फ्रेडला इथुनच हाक मारली असती तर माणुस क्षणातच खिडकीतुन पसार झाला असता. त्यामुळे मीच इथुन हळुन वर जाऊन फ्रेडला सगळे नीट समजावुन मग खाली आणायला आणि माणसाबरोबर मैत्री करायला लावायला हवे होते.

माणसाचे माझ्याकडे लक्ष नव्हते. माझ्याकडे पाठ करुन तो एका कोप-यात बसुन काहीतरी शोधत होता. मी ही संधी पाहुन हळूच वर पळालो.

फ्रेडचे दार बंद होते आणि आतुन घोरण्याचा आवाज येत होता. तो आवाज बंद होईपयंत मी दार आधी हलक्याने आणि नंतर जरा जोरात खरवडत राहिलो. फ्रेडने उठुन दार उघडले.

“आवाज करु नकोस, गुपचुप खाली ये. माझ्या एका मित्राशी तुला भेटवायचेय.” मी कुजबुजलो.

त्याला माझी कल्पना आवडली नसावी बहुतेक.

“काय नाटक हाय? इतक्या रात्री माझी झोपमोड का करतोयस? चल फुट.”

“नाही, खरंच फ्रेड, मी खोटं नाही सांगत. खाली माणुस आहे. तो खिडकीतुन आलाय आणि खुपच लाजाळू आहे. तु खाली येऊन त्याच्याशी बोललास तर त्याला बरे वाटेल.”

“तु ही खुसरपुसर काय लावलीयस—–?” फ्रेड बोलताबोलता अचानक थबकला आणि कान देऊन ऐकु लागला. खालुन अगदी स्पष्टपणे माणसाच्या चालण्याचा आवाज येत होता.

फ्रेड खोलीत धावत गेला आणि काहीतरी घेऊन बाहेर आला. तो हलकेच खाली जाऊ लागला आणि त्याच्या मागुन मी जाऊ लागलो.

माणुस अजुनही पिशवीत सामान भरतच होता. मी दोघांची ओळख करुन देणार तेवढ्यात मुर्ख फ्रेड जोरात ओरडला. इतक्या जोरात की मी घाबरुन चावणारच होतो त्याला.

“काय केलंस तु हे गाढवा? मी सांगितलेलं ना तो संकोची आहे? आता तो घाबरला असणार!”

आणि नेमके तेच झाले. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच माणुस खिडकीतुन पसार झाला. मी त्याला ओरडुन सांगत होतो की मी आणि फ्रेडच आहोत इथे, इतक्यात कुठुनतरी बंदुकीचा बार काढल्याचा मोठा आवाज झाला आणि माझा आवाज त्यात विरुन गेला. माणसाला काहीच ऐकु गेले नसणार.

मी फ्रेडवर खुप वैतागलो होतो. सगळा बट्याबोळ झाला होता. फ्रेड तर आचरटासारखा नाचत होता. निदान बाहेर जाऊन माणसाला तरी समजवावे म्हणुन मी खिडकीतुन बाहेर उडी मारली. फ्रेडनेही माझ्या मागुन उडी मारली ती थेट माझ्याच अंगावर.

बाहेर काळोख पसरला होता. काहीच दिसत नव्हते पण तरीही माणुस तिथेच असणार याबद्दल मला खात्री होती. तो लांब गेला असता तर मला तो पळताना ऐकु आले असते. मी वासावरुन त्याचा माग काढायचा प्रयत्न केला!

फ्रेडचे बाबाही आता खाली आलेले. त्यांच्या हातात बॅटरी होती आणि ते दोघेही माणसाला शोधत होते. मी वासावरुन हुंगत गेलो आणि थोड्याच वेळात माणुस आवारातल्या एका चेडारच्या झाडावर असल्याचा वास मला लागला. मी झाडाखाली उभा राहुन वर पाहायला लागलो पण मला अर्थातच काहीच दिसत नव्हते.

“तु वर आहेस का?” मी ओरडलो, ” घाबरायचे काहीच कारण नाही. तो फ्रेड आहे, माझा जुना मित्र. तु मला जिथुन घेतलेस तिथेच तो कामाला असतो. त्याच्या बंदुकीतुन चुकून बार उडाला. तो तुला काही नाही करणार.”

वर काहीच हालचाल झाली नाही. माझा अंदाज बहुतेक चुकला.

“पळाला बहुतेक..” फ्रेड त्याचा बाबांना सांगत होता एवढ्यात मला वर फांद्यांमध्ये काहीतरी हलल्याचा आवाज आला.

“नाही, पळाला नाही, तो वर आहे बहुतेक.” मी ओरडलो.

“कुत्र्याला सापडला वाटतं तो!”

“हो, वर आहे तो. इकडे ये लवकर आणि भेट त्याला.

फ्रेड झाडाखाली येऊन वर पाहु लागला.

“अरे ए… मुकाट्याने खाली उतर!”

वर काहीच हालचाल दिसेना.

“अरे, तो वर आहे, पण तु जरा व्यवस्थित बोल. तो खुप लाजाळू आहे, त्याला परत सांग खाली यायला.” मी फ्रेडला समजावले.

“ठिक आहे, तुला वर बसायचे तर बस. मी आता फांद्यांवर उगीच गंमत म्हणुन बार टाकतोय.”

आणि मग माणुस हळुहळू खाली उतरु लागला. तो खाली येताच मी त्याच्यावर उडीच टाकली.

“सगळे ठिक आहे, तु घाबरु नकोस. हा माझा मित्रच आहे. तुला तो आवडेल.”

पण काही फायदा झाला नाही. त्यांचे एकमेकांशी अजिबात जमले नाही. मुळात ते एकमेकांशी काही बोललेही नाहीत. माणुस घरात गेला, त्याच्यामागुन फ्रेड बंदुक घेऊन घरात गेला, पण परिस्थिती मात्र जैसे थे! माणुस एका खुर्चीवर बसला, फ्रेड दुस-या खुर्चीवर बसुन राहिला. काही वेळाने मोटारीतुन अजुन काही माणसे आली आणि माणुस त्यांच्याबरोबर निघुन गेला. जाताना मला बायही केले नाही त्याने.

ती सगळी माणसे गेल्यावर फ्रेड नी त्याच्या बाबांनी माझे इतके लाड करायला सुरवात केली की काय सांगु! मला तर काहीच कळत नव्हते. फ्रेडशी ओळख झाल्याचा माणसाला काहीच आनंद झालेला दिसला नाही पण फ्रेड मात्र या भेटीने अगदी भारावुन गेल्यासारखा वागत होता. माणसे अशी विचित्र का वागतात? पण तेवढ्यात फ्रेडच्या बाबांनी माझी फेवरीट डिश अगदी डब्बा भरुन आणुन माझ्या पुढ्यात ठेवली आणि मी उगीच डोक्याला शीण द्यायचे बाजुला ठेऊन माझ्या आवडत्या कोल्ड हॅमवर ताव मारायला सुरवात केली. आई नेहमी म्हणायची,” ज्या गोष्टींशी आपला संबंध नाही त्याचाबद्दल उगीच विचार करुन डोके पिकवुन घ्यायचे नाही. कुत्र्याने नेहमी त्याच्या पोटाला दोन घास कसे मिळतील हा विचार करायला हवा. दुस-यांच्या भानगडीत उगीचच नाक खुपसण्यापेक्षा गुपचुन आपल्या वाट्याची भाकर खावी नी चुपचाप पडुन राहावे हेच बरे!. आई तशी खुपच नॅरो माईंडेड होती पण तिचा कॉमनसेन्स मात्र चांगला होता.

Categories: The Mixer | १ प्रतिक्रिया

परोपकारी – ४

त्यानंतर आमचे मस्त जमले. प्रत्येकवेळी खिडकीकडे खुडबुड ऐकु आली की मी अजिबात लक्ष न देता पडुन राहायचो आणि दर वेळी मला हाडूक किंवा तसेच काहीतरी चांगले मिळायचे. एकदा का सवय झाली ना, की सगळे कसे सोप्पे होऊन जाते.

जवळजवळ आठवडाभराने माणसाने मला सकाळीच घराबाहेर नेले. बराच वेळ चालल्यावर आम्ही एका मोठ्या गेटपाशी आलो. आतला गुळगुळीत रस्ता आम्हाला थेट एका मोठ्या घरापाशी गेला. किती सुंदर घर होते ते! घराच्या समोर मस्त हिरवळ होती, आजुबाजुला शिस्तबद्ध झाडे उभी होती आणि लांबवर मागे जंगलही दिसत होते.

माणसाने घराची बेल वाजवली. एका म्हाता-या माणसाने दरवाजा उघडला.

‘कोण पाहिजे?’

‘तुम्हाला चांगला राखणीकुत्रा हवाय असे कानावर आले म्हणुन आलोय.’

‘आश्चर्य आहे. मी आता बाहेर जाऊन चांगला कुत्रा कुठे मिळतो का तेच पाहणार होतो. माझ्या कुत्र्याने सकाळीसकाळी बाहेर जाऊन काय खाल्ले कोणास ठाऊ़क. गेला बिचारा.’

‘हम्म. बिचारा. कुठलेतरी कुजलेले हाडबिड खाल्ले असेल.’

‘ह्याचे काय घेणार?’

‘पाच शिलिंग’

‘राखण करतो का बरी?’

‘एकदम…’

‘बघणारा एकदम घाबरेल असा दिसतोय खरा.’

‘हम्म.’

केअरटेकरने माणसाला पाच शिलिंग दिले आणि मला त्याच्याकडे सोडुन तो निघुन गेला.

आजुबाजुच्या नविन गोष्टी, नवे वास, केअरटेकरचे प्रेम इत्यादी गोष्टीत बराच वेळ गेल्याने मला माणसापासुन तोडले जाणे तितकेसे जाणवले नाही. पण दुपारनंतर मात्र मला माणुस कायमचा सोडुन गेला आणि आता परत कधीच भेटणार नाही या विचाराने खुप उदास वाटायला लागले. मी उगिचच घरभर फिरत राहिलो, विव्हळत राहिलो. घर मात्र एकदम मस्त होते. मला वाटलेले त्यापेक्षा बरेच मोठे होते. पण माझे मन मात्र तेथे लागेना. तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? माणसाने मला माराशिवाय काहीच दिले नव्हते तरी त्याच्या आठवणींनी मी व्याकुळ झालो होतो. पण आम्हा कुत्यांचं असंच असतं राव.. संध्याकाळ होईतो मी पुर्णपणे उदास होऊन गेलो. मला चावण्यासाठी एक चप्पल आणि एका खोलीत एक जुने ब्रशही सापडले. पण माझे कशातच मन लागेना. मी नुसता बसुन राहिलो.

एक गंमतीशीर गोष्ट मी नेहमी पाहिलीय. आपण असे वाकडे तोंड करुन बसलेलो असतानाच अचानक आपला मुड पार सुधारुन जाईल अशी घटना घडते. मी असा बसलेलो असताना बाहेर मोटरसायकलचा आवाज आला आणि नंतर कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला.

तो आवाज दुस-या तिस-या कोणाचाही नसुन माझ्या लाडक्या फ्रेडचा होता. अगदी देवासारखा धावून आला तो माझ्यासाठी. त्याच्या म्हातारा उठुन दरवाजाजवळ जाईपर्यंत मी तिथे पोचुन दारावर पायाने घासायला लागलो.

वा! वा!! वा!!! काय मज्जा आहे ना!! मी तर आनंदाच्या भरात बाहेरच्या हिरवळीवर चारदा फे-या मारल्या आणि मगच फ्रेडच्या अंगावर उडी मारली.

‘तू इथे काय करतोयस फ्रेड? केअरटेकर तुझे बाबा आहेत काय? बागच्या जंगलात मोठे ससे आहेत, तु बघितलेयस कधी? तु किती दिवस इथे राहणारेस?माझी आई बरी आहे ना? मला इथे खुप आवडले. तू आता थेट गुत्त्यातुनच आलायस का? तुझ्या बाबांनी मला पाच शिलिंगला विकत घेतले. इतक्यातच माझी किंमत दुप्पट झाली, तु पाहिलेस?’ मला काय बोलू नी काय नको असे झाले होते.

‘अरे, निग्रो छोटू!!!’ मला ह्याच नावाने तिथे हाक मारायचे. ‘तू इथे काय करतोयस? हा कुठे भेटला तुम्हाला बाबा?’

‘एका माणसाकडुन घेतला याला आज सकाळी. बिचा-या बॉबने काय खाल्ले कोणास ठाऊक, गेला बिचारा. हा चांगला राखणकुत्रा आहे ना? तसा भुंकतो ब-यापैकी म्हणा…’

‘असायला हवा. त्याची आई अख्ख्या लंडनमधली सगळ्यात चांगली राखणी आहे. पण हा तर बॉसकडे असायचा. इथे कसा आला ते एक आश्चर्यच..’

बोलतबोलत आम्ही घरात गेलो. नंतर जेवण झाल्यावर गप्पा मारत बसलो. फ्रेड रात्रीपुरताच आला होता. त्याला बॉसने सकाळी परत बोलवलं होतं.

‘तसे मलाही कधी इथुन जातो असे होऊन जाते. काय भयाण जागा आहे ही! तुम्हाला चोरांची भीती वाटत नाही काय इथे?’

‘बंदुक आहे की माझ्याकडे. आणि हा कुत्र्याही आहे. एकट्याने कदाचित भीती वाटलीही असती, पण कुत्र्याची सोबत होते. बॉबपण चांगली सोबत करायचा. इथे कुत्रे खुप कामाला येतात.’

‘कधी कोणी भुरटा चोर फिरकलेला?’

‘आलेला की एक सकाळी. ह्याला विकणारा भुरटाच वाटत होता!’

ते माणसाबद्दल बोलायला लागल्यावर मी फ्रेडला तो माणसाला ओळखतो का म्हणुन विचारले. माणुस मला विकत घेताना फ्रेड कदाचित त्याला भेटण्याची शक्यता होती.

‘तुला तो खुप आवडेल. तू भेटायला हवं होतंस त्याला.’ मी म्हणालो.

‘आता हा कशाला गुरगुरतोय? कुठे काही गडबड तर नाही ना?’ फ्रेड म्हणाला.

म्हातारा जोरात हसला, ‘तो गुरगुरत नाहीय तर झोपेत बडबडतोय. तुला भास होताहेत. शहरात राहुन तू खुप भित्रा झालायस.’

‘भास होताहेत खरे. दिवसा तसे इथे काही वाटत नाही, पण रात्री खुप भीती वाटते. काय भयानक शांतता आहे इथे. तुम्ही कसे राहता इथे कळत नाही. मी दोनचार रात्री इथे काढल्या तर नक्कीच भुते दिसु लागतील मला.’

म्हातारा जोरात हसला. ‘तुला तसे वाटतेय तर ही बंदुक ठेव तुझ्याकडे आज. मला तशी काय गरज नाहीय तिची.’

‘आणा इकडे. आणि अजुन असतील तर त्याही सोबत ठेवेन मी.’

ते दोघेही वर गेले आणि मी हॉलमध्ये. बॉबची बास्केट होती तिथे ती आता मला मिळाली. बास्केट एकदम चांगली होती, पण फ्रेड भेटल्याच्या आनंदात मला धड झोपही येईना. शिवाय कुठूनतरी उंदरांचा वास येत होता. कुठून ते शोधल्याशिवाय मला चैन पडले नसते.

मी असाच हुंगत होतो तेव्हा काहीतरी आवाज झाला. मला आधी वाटले उंदिरच आहेत पण नीट ऐकले तेव्हा लक्षात आले की खिडकीबाहेरुन आवाज येत होता. कोणीतरी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत होते बहुतेक.

इथे आई असती तर एव्हाना तिने अख्खे घर दणाणुन सोडले असते. मीही तेच केले असते म्हणा, पण मला माणसाने वेगळे वळण लावलेले. अर्थात बाहेर माणुस असण्याची शक्यता फारच कमी होती कारण तो जाताना मला परत भेटण्याबद्दल काहीच बोलला नव्हता. तरीही मी भुंकलो नाही. आहे तिथेच उभे राहुन मी कान लावले. एवढ्यात खिडकी उघडली आणि कोणीतरी त्यावर चढायला लागले. मी एकदा नीट हुंगले आणि तो माणुसच आहे हे माझ्या लक्षात आले.

मी एवढा आनंदलो की एकदम जोरात ओरडलो. पण माणसाला ते आवडत नाही हे लक्षात येताच एकदम गप्प झालो. तरी मी त्याच्याकडे धावत गेलो आणि त्याच्या अंगावर उड्या मारल्या. त्याने मला एका कोप-यात गुपचुप पडायला सांगितले. मला भेटुन त्याला अजिबात आनंद झाला नव्हता. मी गुपचुप कोप-यात जाऊन पडलो.

खोलीत अंधाराने भरलेली पण माणसाने सोबत एक कंदिल आणलेला. त्या प्रकाशात तो इकडेतिकडे फिरुन सामान गोळा करुन सोबत आणलेल्या बॅगेत भरत होता. मध्येच तो थांबुन काहीतरी ऐकत होता आणि मग परत सामान भरायला सुरवात करत होता. तो जरी भराभर हालचाल करत होता तरी आवाज मात्र अजिबात करत नव्हता. फ्रेड किंवा त्याचे बाबा तिथे आलेले त्याला अजिबात आवडणार नव्हते हे तर स्पष्ट दिसत होते.

कोप-यात पडुन त्याच्याकडे पाहताना मी ह्या विचित्र वागणुकीचाच विचार करत होतो. मी स्वतः जरा जास्तच मोकळा असल्याने इतर कोणाला तसा मोकळेपणा आवडत नसेल तर त्याचे मला खुप नवल वाटते. अर्थात गुत्त्यामध्ये मला प्रत्येक माणुस हा प्रत्येक कुत्र्यासारखाच वेगळा असतो हे लक्षात आलेले. कधी बॉसचा बूट चघळायला लागलो की बॉस मला लाथ मारायचा. तेच फ्रेडचा चघळला तर तो गळ्याखाली खाजवायचा. माणसांचे हे असेच आहे. काही बुजरे असतात तर काही सगळ्यांमध्ये मिसळतात. ठिक आहे, पण माणसाच्या बाबतीत जरा अतीच होत होते असे मला वाटायला लागले. आणि त्यात तो स्वतः सुधरायचाही प्रयत्न करत नव्हता. बघा ना.. एखादा माणसाला लोकांना भेटायला इतके जीवावर येते की तो त्यांच्या घरी मध्यरात्री ते आपापल्या बिछान्यात झोपल्यावरच येतो. काय हा मुर्खपणा! असला लाजाळूपणा माझ्या एकुण व्यक्तीमत्वातच नसल्याने मला हा प्रकारच कळत नव्हता. अर्थात प्रयत्न केल्यास कुठलीही गोष्ट जमु शकते. पण माणुस प्रयत्नच करत नव्हता. उलट जमेल तितके लोकांना टाळण्याकडेच त्याचा कल होता.

मला माणुस आवडत होता. अर्थात तो कोणालाही चटकन आवडेल असा नव्हता पण आम्ही दोघांनी काही काळ एकत्र घालवलेला होता आणि मग अशा वेळी त्याचा लळा लागला नसेल तर मग मी कुत्रा कसला?

Categories: The Mixer | यावर आपले मत नोंदवा

परोपकारी – ३

पण जास्त वेळ गप्प बसणे माझ्या स्वभावातच नाहीय ना…

मी परत तोंड उघडले, ‘आता इथेच राहायचे?? आपण खरेच बाहेरगावी जाणारोत का? तो पोलिस खुप चांगला होता ना? तुला पोलिस आवडत नाय काय? गुत्त्यात माझी खुप पोलिसांशी ओळख होती. आज जेवायला काय हाय? त्या कपाटात काय हाय मी बघु? तु मला परत खाली घेऊन जाणार काय? मी बाहेर जाऊन कोणी मांजर भेटते का बघुन येऊ?’

‘बोंबाबोंब एकदम बंद’ माणुस म्हणाला.

‘बाहेरगावी गेल्यावर आपण कुठे राहणार? त्या घराला केअरटेकर असणारेय? फ्रेडचे बाबा केंटमधल्या एका मोठ्या घराचे केअरटेकर हायेत. फ्रेड नेहमी सांगतो त्यांच्याबद्दल. तु फ्रेडला भेटला नाहीस. तो खुप चांगला आहे. मला, आईला सगळ्यांना तो खुप आवडतो.’

मी फ्रेडबद्दल अजुन सांगणार होतो, फ्रेड माझा तसा खास मित्र आहे. पण तेवढ्यात माणसाने एक काठी काढली नी मला झोडपायला सुरवात केली.

‘गप्प बस बोल्लं की गप्प बसायचं’ तो बोलला.

हा माणुस म्हणजे बुजरेपणाची हद्दच होती अगदी. आपण त्याच्याशी नुसते बोललो तरी त्याला त्रास होतो. पण शेवटी तो बॉस. म्हणुन मी गप्प बसलो.

पोलिसाला सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या रात्री खरेच बाहेरगावी गेलो. मला इतका आनंद होत होता की काय सांगु… फ्रेड गावाबद्दल इतके बोलायचा की मलाही गाव कधी पाहायला मिळेल असे व्हायचे. वडलांना भेटण्यासाठी फ्रेड अधुन मधुन मोटरसायकलने केंटला जायचा. एकदा माझ्यासाठी एक खार घेऊन आलेला. मला वाटले मला खाण्यासाठीच घेऊन आलाय की काय! पण आई लगेच म्हणाली,’ कुत्र्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, जगातली प्रत्येक वस्तु काय त्याच्या खाण्यासाठी बनली नाहीय.’

आम्ही पोचेतो खुप अंधार पडला. पण माणसाला रस्ता माहित होता बहुतेक. माझ्या गळ्यातल्या दोरीला एक हिसका देऊन त्याने एक जवळजवळ निर्मनुष्य रस्ता पकडला नी आम्ही चालु लागलो. कितीतरी वेळ आम्ही चालतच होतो. पण एकुणच मी इतका उत्साहित झालो होतो की मला अजिबात थकवा जाणवत नव्हता. प्रत्येक पावलाबरोबर आपले जग विस्तारतेय ही भावना प्रबळ होत होती.

चालताना मधुन मधुन मोठ्ठी घरे लागत होती. ती बंद आहेत असे बाहेरुन वाटत होते. पण फ्रेडच्या बाबांमुळे मला माहित होते की या अशा मोठ्ठ्या घरांमध्ये आत कुठेतरी एक केअरटेकर राहात असतो. ही घरे खुप श्रीमंत माणसांची असतात नी ते या घरांमध्ये फक्त सुट्ट्यांमध्येच राहायला येतात. बाकीचा वेळ केअरटेकर राहतो नी त्याच्याकडे राखणीसाठी मोठ्ठा कुत्राही असतो. माझीही निवड अशीच राखणकुत्रा म्हणुन झालीय का हा विचारही माझ्या मनात एकदा येऊन गेला.

‘तु पण केअरटेकर आहेस काय?’ मी माणसाला विचारले.

‘गप्प बस.’ तो खेकसला. म्हणुन मग मी गप्प बसलो.

बराच वेळ चालल्यावर आम्ही एका लहानशा घराजवळ पोचलो. आमची चाहुल लागताच एकजण बाहेर आला. माणुस त्याला बहुतेक ओळखत होता कारण त्याने लगेच बिल म्हणुन हाक मारली. आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणुस बिलबरोबर अगदी चांगला बोलायला लागला. बुजरेपणा कुठे गेला कुणास ठाऊक? ते दोघे एकमेकांना चांगलेच ओळखत होते बहुतेक.

‘ह्योच का त्यो बाबा?’ बिल माझ्याकडे पाहात म्हणाला.

‘दोपारला घेतला याला.’ माणुस म्हणाला.

‘हम्म.. दिसायला लईच भारी. अगदी पायजे तसंच कुत्रं हाय हे.. पण काय कामाचं राव? उगा नस्ती बिलामत कशापाई घ्यायची म्या म्हंतो? एकडाव म्या म्हंतो तसं करुन का बगु नये? कुत्र्याला गप कराचं नी गुमान आपलं काम कराचं.’

‘तसं नाय करता येत बाबा,’ माणुस म्हणाला,’ कुत्रा रातीचा घरातच आस्तो. मंग त्याला गप कराचं तर ते दिवसाच करावं लागतं. आन मग होतं काय? सांजपावेतो नवं कुत्रं येऊन लागतं नायतं ते बेणं रातभर बंदुक घेऊन जागत बसतं. तेबी साधे लोक नायहेत बा. रखवालीचे मोजुन घेतात पैकं. कामात खोटी करुन चालत नै….

माणसाला एवढे मोठ्ठे भाषण देताना मी पहिल्यांदाच ऐकले. बिललाही बहुतेक पटले. तो गप विचार करु लागला.

‘तेबी खरंच म्हना.. आता याला तैयार करुया नीट.’ तो म्हणाला.

मी जगाचा अनुभव घ्यायची गोष्ट करू लागलो की आई नेहमी म्हणायची, ‘उगाच पश्चाताप होईल. डोंगर दुरुनच साजरे दिसतात.’ आणि आईचे हे म्हणणे अगदी बरोबर होते याचा प्रत्यय मला लगेचच यायला लागला.

खरेतर सगळ्यात मोठा त्रास माणसाचा बुजरेपणा हाच होता. त्याची दखल घेतलेलीही त्याला आवडत नसे.

पहिल्या दिवशीपासुनच याची सुरवात झाली. दिवसभरच्या घडामोडींनी दमुन सैपाकघरात गाढ झोपलो असताना अचानक कसल्यातरी आवाजाने मी दचकुन जागा झालो. कोणतरी खिडकीबाहेर काहीतरी खटपट करत होतं. बहुतेक आत यायचा प्रयत्न चाललेला.

आता मला सांगा, माझ्या जागी तुम्ही असता तर काय केले असते? मला समजायला लागायच्या आधीपासुनच आईने अशा वेळी काय करायचे ते शिकवायला सुरवात केली होती. ती आमची बाराखडीच आहे असे समजा ना. ‘तु एखाद्या खोलीत आहेस आणि कोणी आत यायचा प्रयत्न केला तर आधी भुंकायला लागायचे. भले त्या माणसाला खोलीत काही काम असेलही, पण आधी भुंकायचे नी मग विचारायचे. कुत्रे घरात शोभेसाठी ठेवलेले नसतात हे कायम लक्षात ठेवायचे.

मी मान वर केली आणि जोरात भुंकायला सुरवात केली. माझा आवाज घराण्याच्या नावाला साजेसा असा मोठ्ठा होता. पौर्णिमेच्या रात्री पुर्ण चंद्र आकाशात वरती ला की मी असा मस्त आवाज लागायचो की पुर्ण गल्लीतले लोक खिडक्या उघडून माझ्या नावाने ओरडायचे.

‘माणसा, धाव. बिल, धाव. धावा लौकर. खिडकीतुन चोर शिरतोय.’

तेवढ्यात कोणीतरी दिवे लावले आणि मला माणुस दिसला. खिडकीतुन तोच आला होता.

एक काठी उचलुन त्याने मला झोडपायला सुरवात केली. मला काही समजेचना. मी काय चुक केली तेही कळेना. पण तो मालक होता, त्यामुळे मी गप्प बसलो.

तुमचा विश्वास बसणार नाही पण त्यानंतरच्या प्रत्येक रात्री हेच घडत गेले. कधीकधी तर एका रात्री दोन-तिनदा! मी आपला जोरात भुंकायला लागायचो, मग माणुस दिवा लावायचा नी मला झोडपायला लागायचा. मी चक्रावुन गेलो. आईने हेच शिकवले होते याची मला खात्री होती. मी ऐकण्यात एवढी मोठी चुक नक्कीच केली नव्हती. भुंक.. भुंक.. आईच्या शिक्षणपद्धतीचा भुंकणे हा पाया होता. आणि इथे मला भुंकल्याबद्दल रोज मार पडत होता.

डोके फुटुन जाईपावेतो विचार केल्यावर अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आईच्या विचारातल्या तृटी माझ्या लक्षात येऊ लागल्या. आईने सांगितलेले बरोबर होते पण कुठे? तर जिथे माणसे अशी बुजरी नसतात तिथे. पण प्रसंगानुरूप आपल्याला बदलावे लागते. इथे हा माणुस म्हणजे बुजरेपणाची कमाल होती. जराजरी ठुस्स झाले तरी तो चार फुट उडायचा. आईने शिकवलेले सगळे कितीही शहाणपणाचे असले तरी इथे गरज होती ती माझ्या मालकाला जसे हवे तसेच वागण्याची. आईने सांगितल्याप्रमाणे वागुन मला मारच मिळाला होता. आता स्वतःचे डोके चालवणे भाग होते.

म्हणुन मग त्या रात्री खिडकी उघडल्याचा आवाज आल्यावर मी अजिबात लक्ष न देता पडुन राहिलो. साधे गुरगुरलोही नाही. तो जो कोणी होता तो आत आला नी हातात कंदिल घेऊन इकडे तिकडे फिरू लागला. तो माणुसच आहे हे मी वासावरुन ओळखले पण एकही प्रश्न विचारला नाही. आणि मग त्याने दिवा लावला नी माझ्याजवळ येऊन मला चक्क थोपटले. एवढ्या दिवसात पहिल्यांदाच!

‘शाब्बास!.’ तो म्हणला,’ हे घे बक्षिस.’

आणि त्याने मला रात्रीच्या जेवणाचे भांडे चाटायला दिले.

Categories: The Mixer | यावर आपले मत नोंदवा

परोपकारी -2

आता, मी माणसांमध्ये चटकन मिसळतो. हवेतर माझ्यातला तो दोषच आहे समजा ना! पण माझा स्वभावच तसा आहे. मला माणसे आवडतात. मला त्यांच्या बुटांचा स्वाद आवडतो, पायांचा वास आवडतो इतकेच काय त्यांचा बोलण्याचा आवाजही आवडतो. आता हा माझा कमकुवतपणा असेलही, पण कोणी माझ्याही एक शब्द जरी बोलला तरी माझ्या कण्यातुन थेट शेपटीपर्यंत धावत शिरशिरी जाते आणि माझी शेपुट आपसुकच हलायला लागते.

आताही मी शेपुट हलवायला लागलो. माणसाने मात्र माझ्याकडे थोडे दुर्लक्षच केले. मला थोपटलेही नाही. मला तेव्हा वाटले – जे नंतर खरेच निघाले – की तो थोडा बुजरा असणार. त्याला थोडे बरे वाटावे म्हणुन मी त्याच्या अवतीभवती उड्या मारु लागलो. आई परत गुरगुरली. तिला आवडले नसणार.

‘बघा, त्याला तुम्ही आवडलेले दिसताय.’ मालक म्हणाला.

माणुस एक शद्बही बोलला नाही. तो कसल्यातरी विचारात होता वाटते. तो अगदीच शांतप्रकृती प्राणी होता. त्याला बघुन मला जोची आठवण झाली. कोप-यावरच्या दुकानातला हा म्हातारा कुत्रा दिवसभर जमिनीवर पडुन येणा-याजाणा-यांना बघत राही, पण कधीही काहीही बोलत नसे.

मालकाने परत बोलायला सुरवात केली. त्याने माझी जी तारिफ चालवलेली ती ऐकुन मी तर चक्रावलोच. त्याला माझे एवढे कौतुक असेल असे मला कधी वाटलेच नव्हते. त्याचे बोलणे ऐकुन मी भरपुर बक्षिसे मिळवणारा कुत्रा आहे असेच कोणालाही वाटले असते. पण माणसावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो तोंडातुन शब्दही काढत नव्हता.

मी लाजेने मरुन जाईपर्यंत माझी स्तुती करुन झाल्यावर मालक थांबला आणि माणसाने तोंड उघडले.

‘बस्स झाले,’ तो म्हणाला,’ मी याच्यासाठी अर्धा क्राऊन देईन आणि हा अगदी स्वर्गातुन जरी अवतरलेला असला तरी यापेक्षा एकही छदाम मी देणार नाही. बोला, आहे कबुल?’

काय चाललेय ते माझ्या लक्षात आले नी माझ्या अंगातुन परत एकदा शिरशिरी लहरत गेली. माणुस मला विकत घेऊन जायला आला होता. मी आता मालकाकडे आशेने बघायला लागलो.

‘माझ्या मुलासारखा समजतो मी याला.’ मालक उगीचच जराश्या भिजल्या स्वरात म्हणाला.

‘त्याच्या चेह-यामुळे तुम्हाला वाटत असेल तसे.’ माणुस कायच्या काय बडबडला.’ तुम्हाला मुलगा असता तर असाच दिसला असता. मी अर्धा क्राऊन देईन, आणि माझ्याकडे जास्त वेळ नाहीय.’

‘ठिक आहे,’ मालकाने उसासा टाकला,’ त्याला अगदी फुकटातच दिल्यासारखे आहे हे. द्या पैसे.’

माणसाने एक दोरी काढली आणि माझ्या गळ्याभोवती गुंडाळली.

आई जोरजोरात ओरडुन मला सुचना देत होती आणि घराण्याचे नाव उंचावण्याबद्दल सांगत होती, पण मला आता काही ऐकायला येत नव्हते.

‘गुडबाय आई, गुडबाय मालक, गुडबाय फ्रेड नी सगळ्यांना माझा शेवटचा टाटा. मी इथुन बाहेर दुनिया बघायला चाललो. बुज-या माणसाने मला अर्ध्या क्राऊनला विकत घेतलेय. इतके छान वाटतेय.’

माणसाने मला लाथ घालुन गप्प बसायला सांगेपर्यंत मी गोलगोल फिरत ओरडत होतो. त्याने सांगितल्यावर मी गप्प बसलो.

आम्ही कुठे चाललेलो माहित नाही पण आम्ही बरेच चाललो. मी कधीच आमची गल्ली सोडुन बाहेर पडलो नव्हतो त्यामुळे बाहेरचे जग एवढे मोठे असेल याची मला कल्पनाच आली नाही. आम्ही चाल चाल चालत होतो आणि मी जरा कुठे रेंगाळलो की माणुस लगेच माझी दोरी ओढुन मला खेचत होता. रस्त्यावरच्या फिरणा-या एकाही कुत्र्याची मला साधी विचारपुसही करता आली नाही.

असेच मैलोनमैल चालत चालत आम्ही शेवटी एका अंधा-या घराच्या दारात आलो. आत शिरणार तोच कुठून कसा देव जाणे पण एक पोलिस तिथे उपटला. त्याला पाहताच माणसाने ज्या चपळाईने घरात घुसायचा प्रयत्न केला त्यावरुन पोलिसाचे तिथे येणे त्याला फारसे आवडले नाही हे माझ्या लक्षात आले. मी जितका वेळ त्याच्याबरोबर काढत होतो तेवढाच तो किती बुजरा आहे ते माझ्या लक्षात येत होते.

‘नमस्कार…..’ पोलिस म्हणाला आणि आम्हाला नाईलाजाने थांबावे लागले.

‘तुझ्यासाठी एक निरोप आहे मित्रा.’ पोलिस म्हणाला,’थेट आरोग्य खात्याकडुन. तुला हवापालटाची गरज आहे, कळलं का?’

‘ठिक!’

‘शक्य तितक्या लवकर हवापालट कर, नाहीतर आम्हाला बंदोबस्त करावा लागेल, काय?’

मी माणसाकडे अतीव आदराने पाहिले. पोलिसांनाही त्याच्या तब्येतीची इतकी काळजी? हा नक्कीच कोणीतरी मोठा माणुस असणार.

‘रात्रीच गावाला निघतोय.’ माणुस म्हणाला.

‘गावाचे नशीब भारी दिसतेय. जा तर, इरादा बदलु नकोस.’

आम्ही दरवाजातुन आत गेलो आणि हजारो पाय-या चढुन एका अंधा-या खोलीत गेलो. उंदरांचा भयानक वास सुटलेला. माणुस आत जाऊन बसला आणि तोंडातल्या तोंडात कोणालातरी शिव्या देऊ लागला. मी त्याच्याकडे बघत बसलो.

Categories: The Mixer | यावर आपले मत नोंदवा

अपेक्षा

माझी एक्स-पर्सनल ट्रेनर तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेली. खुप छान नी सुंदर मुलगी. चांगले विचार बाळगणारी नी त्यांच्यावर ठाम राहणारी. तिचे लग्न जमायच्या नी त्याआधीच्या काळात ब-याच वेळा बोलायची ती लग्नाबद्दल. मला म्हणाली, ‘मी यांना आधीच सांगितलेय की माझ्या त्यांच्याकडुन काहीच अपेक्षा नाहीयेत.’ तिचे म्हणणे मी तेव्हा फारसे मनावर घेतले नाही. पण कुठेतरी मला हे काहीही अपेक्षा न ठेवणे खटकले. काहीच अपेक्षा नाहीत मग त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही का जाताय? आणि जरी म्हटले काहीच अपेक्षा नाहीत तरी या माणसाबरोबर आपले आयुष्य शांतपणे जावे ही अपेक्षा तर आहेच ना?

या अपेक्षाप्रकरणावर जसजसा विचार करत गेले तसे हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात यायला लागले. किती सहजतेने आपण म्हणतो की माझ्या तुझ्याकडुन काही अपेक्षा नाहीयेत. पण हे म्हणतानाही किती अपेक्षा असतात! अगदी एक दिवसाच्या बाळाच्याही अपेक्षा असतात की पोटात भुक लागली की तोंडात दुध मिळावे. नाही मिळाले की बघा कसा तो अर्ध्या रात्री बोंबाबोंब करुन सगळ्यांची झोप उडवतो ते. त्याला कुठे माहित असते हे अपेक्षाप्रकरण? तरीही अपेक्षा असतेच ना?

आणि का नसावी अपेक्षा? कळायला लागल्यापासुन आपण इतरांपासुन आणि आपल्यापासुनही अपेक्षा ठेवायला लागतो. इच्छा या शब्दाबरोबर अपेक्षा या शब्दाचे लग्न उगीच लागलेले नाही. आई मुलांवर निरपेक्ष प्रेम करते, अमुकतमुक समाजसेवक लोकांची निरपेक्ष सेवा करतात इ.इ. वाक्ये खोटी आहेत हो! मुलांवर निरपेक्ष प्रेम करताना आपल्या मुलांचे भले व्हावे ही अपेक्षा आईने मनी बाळगलेली असतेच की. आजा-यांची निरपेक्ष सेवा करणा-याच्या मनात हा आजारी लवकर बरा व्हावा ही अपेक्षा असतेच की. आता तुम्ही भलेही त्याला इच्छा म्हणा. पण इच्छा ही कुठे अपेक्षेपेक्षा वेगळी आहे? इच्छा नी अपेक्षा एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. मग निरपेक्ष काय आहे जगात? माझ्या मते काहीही नाही. सर्वसंगपरित्याग केलेल्या साधुंचीही ‘आता जन्ममरणाच्या फे-यातुन सुटका व्हावी नी मोक्ष मिळावा’ ही अपेक्षा असतेच. जन्माला येताच अपेक्षांचे डोंगर मनात उभे रहायला लागतात, हे डोंगर फक्त मृत्यूच कोसळवतो.

आपल्याला जन्मापासुन चिकटलेल्या ह्या अपेक्षांना आपण आपल्यावर कितपत अधिकार गाजवायला देणार यावर आपले या जन्मातले सुख-दु:ख अवलंबुन आहे. आपल्या अपेक्षांचा प्राधान्यक्रम (priorities) आपण आपल्या नकळतच ठरवलेला असतो. आता या अपेक्षा ज्यांच्याकडुन आहेत त्यांचा प्राधान्यक्रमही आपल्या प्राधान्यक्रमाशी जुळला तर आयुष्य सुखात जाणार, नाहीतर…… पण हे नाहीतरच जास्त करुन आपल्या वाट्याला येते कारण दोन माणसांचा प्राधान्यक्रम कधी जुळत नाही. मग एका कुटूंबात राहणा-या ५-६ जणांचा प्राधान्यक्रम कसा काय जुळणार? तरी बरे, एका बाजुने लोक आपल्या प्राधान्यक्रमाविषयी जागरुक व्हायला लागलेत त्याचवेळी कुटूंबातल्या लोकांची संख्या कमी व्हायला लागलीय. आजपासुन १०० वर्षांपुर्वी जेव्हा एका कुटूंबात कमीतकमी ५० माणसे असायची तेव्हा जर प्रत्येकजण आपल्या अपेक्षांचे बोजे दुस-यावर टाकुन त्याचा नी माझा प्राधान्यक्रम जुळावा अशी अपेक्षा करत बसला असता तर लोकांचे एकुणच जीवन किती दु:खी झाले असते. पण तेव्हा कुटूंबातल्या माणसांची संख्या जास्त असली तरी त्यात प्राधान्यक्रम बाळगणा-या लोकांची संख्या खुपच कमी असायची. अशा लोकांना तेव्हा कुटूंबप्रमुख म्हणुन ओळखले जात असे आणि इतर मंडळी कुटूंबप्रमुखाच्या प्राधान्यक्रमाशी आपला प्राधान्यक्रम गुपचुप जुळवुन घ्यायची. :) आजच्यासारखे घरातल्या प्रत्येकाचा स्वतंत्र प्राधान्यक्रम ही चैन तेव्हा लोकांना माहितही नव्हती, त्यामुळे ती परवडायची चिंता कोणी केली नाही.

पण आजच्या जगात मात्र आपणाला स्वतःचा प्राधान्यक्रम जपायचा आहे, घरातल्यांनी नी जमले तर बाहेरच्यांनीही आपल्या प्राधान्यक्रमाला प्राधान्य द्यावे ही अपेक्षाही असते सोबत. प्रत्येकाची हीच इच्छा. आणि जितकी ही इच्छा तीव्र तितकी कोणाला माझे काहीच पडले नाहीय ही भावना प्रबळ होत जाते. मग सुखात आयुष्य घालवायचे, आनंदात स्ट्रेसफ्री जगायचे इ.इ. गोष्टींचे काय? आपल्या प्राधान्यक्रमाला इतरजण केराची टोपली दाखवताहेत हे पाहिल्यावर स्ट्रेसफ्री जगणे शक्य तरी आहे का? :)

आहे शक्य. जरा मी, माझे, माझा आनंद, मला हे वाटते, माझे हे मत आहे ह्या म ने सुरू होणा-या गोष्टी बाजुला ठेवल्या नी दुस-याचा प्राधान्यक्रम काय आहे ह्याच्याकडे लक्ष दिले तर त्याच्या प्राधान्यात आपल्या गोष्टी सहज मिसळून देता येतील.

लग्नाआधी तासनतास फोनवर बोलणा-या प्रियकराचा नवरा झाल्यावर त्याला दिवसातुन एकदोनच फोन करायला वेळ मि़ळायला लागला म्हणुन त्याचा फोन येताच बायको त्याच्यावर रागावू लागली तर एक-दोन फोन येतात तेही यायचे बंद होतील. :) अशा वेळी त्याला मी रोज अमुक वाजता फोन करेन असे सांगुन आपणच फोन करणे श्रेयस्कर ठरेल. त्याने आधीसारखाच फोन करत राहिले पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर भयानक भडकण्याशिवाय आपल्या पदरात काहीही पडणार नाही. त्याचा प्राधान्यक्रम आता बदललाय हे गुपचुप मान्य करुन टाकावे :)

जोक्स अपार्ट, आपण जर दुस-याच्या अपेक्षा काय आहेत ते बघुन त्याप्रमाणे वागायला लागलो तर घरातले तापमान बरेचसे आटोक्यात राहिल आणि आपल्याला हवे ते सुख, शांती, आनंद स्वतःहुन आपल्या दारात येतील. यासाठी गरज आहे जरा पेशन्स ठेवायची. वर लिहिल्याप्रमाणे ‘म’ने सुरू होणा-या गोष्टी बाजुला ठेवायच्या नी दुस-याची अपेक्षा काय ते पाहायचे. समोरचा माणुस जे काय वागतोय ते असे का वागतोय ह्याचा विचार करायची सवय लावायची. त्याच्या बाजुने विचार करुन पाहायचा. हे सुरवातीला खुपच कठीण जाईल. अचानक आपण कोणीच नाही आहोत, आपल्याला कोणी महत्त्व देत नाहीये, सगळे आपापल्या जगात मश्गुल आहेत, मी जगतेय की मरतेय हेही पाहायला कोणाला वेळ नाहीय अशा भावना वारंवार दाटून येतील. पण परत तेच…. पेशन्स ठेवायचा. हळुहळू इतरांचा प्राधान्यक्रम आपल्याला थोडाफार आपल्यासाठीही अ‍ॅडजस्ट करता येतो. आणि करता नाही आला तर निदान दुस-याचा प्राधान्यक्रम काय आहे ते कळते, आपण त्यात कुठे बसतो तेही कळते आणि मग उगीचच फुकटच्या अपेक्षा ठेऊन आपण आपला नी त्याचा दोघांचाही दिवस खराब करत नाही. अगदीच सुखात राहिलो नाही तरी स्ट्रेसफ्री तरी नक्कीच राहतो.

मी हे करुन पाहिले आणि यश मिळवले. अगदी १००% नाही, पण माझा स्ट्रेस ब-याच प्रमाणात कमी केला. तुम्हीही पाहा करुन. :)

Categories: असेच काही बाही | १ प्रतिक्रिया

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.

Follow

Get every new post delivered to your Inbox.